Solapur : 74 मिनिटे स्टेशनवर थांबली ट्रेन अन् घडला थरार! यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसवर दरोडा
Solapur : पुन्हा एकदा रेल्वेवर दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Solapur : गेल्या काही महिन्यांपूर्वी कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेगाडीवर साताऱ्याजवळ दरोडा पडण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. चोरट्यांनी सिंग्नलवर कापड टाकले होते. यामुळे लोकोपायलटला सिग्नल दिसला नाही. परिणामी रेल्वे मध्येच थांबली. याचा फायदा घेत दरडोखोरांनी रेल्वेत घुसून लूट केली होती. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा रेल्वेवर दरोडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये शनिवारी पहाटे थरारक दरोड्याची घटना घडली. ४ ते ५ अज्ञात दरोडेखोर रेल्वेच्या स्लीपर डब्यांमध्ये घुसले. त्यांनी थेट प्रवाशांना मारहाण करण्यास सुरूवात केली. मध्यरात्रीची वेळ असल्याने प्रवासी गाढ झोपेत होते. याचाच फायदा घेत महिलांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच मोबाईल फोन लुटून दरोडेखोर पसार झाले.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेस पहाटे २.४९ ते ४.०३ या कालावधीत तब्बल ७४ मिनिटे तडवळ रेल्वे स्थानकावर उभी होती. याच संधीचा फायदा घेत ४ ते ५ दरोडेखोरांनी एस-४, एस-६ आणि एस-७ या स्लीपर डब्यांमध्ये प्रवेश केला. काही जण थेट डब्यात शिरले, तर काहींनी खिडक्यांमधून हात घालून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू हिसकावण्यास सुरुवात केली.
एक व्यक्ती गंभीर जखमी
दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण केली. प्रवाशांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करताच त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. नाकाला गंभीर इजा होऊन चेहऱ्यावरून रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांनी त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले.
हेही वाचा : Cancer surgery : ‘आपुलकी मेडिकल सेंटर’मध्ये कर्करोगावरील दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी; रुग्णाला मिळाले नवजीवन
एकच गोंधळ उडाला
या दरोड्यात सोलापूरचे प्रवासी महेश गोपाळ पवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे पाच तोळे वजनाची, अंदाजे १.४३ लाख रुपये किमतीची सोन्याची चैन दरोडेखोरांनी हिसकावून नेली. याशिवाय अन्य प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूही लुटण्यात आल्या. घटनेनंतर डब्यात एकच गोंधळ उडाला आणि प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.
रेल्वेच्या हेल्पलाईनवर तक्रार आली अन्…
रेल्वेच्या हेल्पलाईनवर तक्रार मिळाल्यानंतर गाडी पहाटे ४.५८ वाजता सोलापूर स्थानकावर पोहोचताच आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महेश गोपाळ पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तांबोळी यांनी फॉरेन्सिक पथकासह तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे.



