सातारच्या हिरकणीचा करुण अंत ! रायडर्स शुभांगी पवारचा टँकरच्या धडकेत जागीच मृत्यू

नांदेड – नवरात्र उत्सवानिमित्ताने दुचाकीवरून यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती व्हावी व रस्ते सुरक्षाविषयी माहिती देण्यासाठी निघालेल्या सातारच्या हिरकणी महिला रायडर्स ग्रुपमधील रायडर्स शुभांगी पवार यांचा अपघातात करुण अंत झाला.
शुभांगी यांच्या दुचाकीला मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील भोकर फाटा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अपघात झाला. सातारा जिल्ह्यातील हिरकणी रायडर शुभांगी पवार (वय- 42) यांच्या गाडीला टँकरची जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या 10 ऑक्टोबर रोजी 1 हजार 868 किमी प्रवासासाठी मोटारसायकलवरून निघाल्या होत्या. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन हा ग्रुप तुळजापूर येथे पोहचल्या. पुढे आई तुळजाभवानीचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर पुढे माहूर गडाची रेणुकामाता दर्शनासाठी या सर्वजण जात होत्या. त्यावेळी भोकर फाटा दाभड येथे शुभांगी पवार यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या घटनेने साताऱ्यात हळहळ व्यक्त आहे.
ग्रुप प्रमुख मनिषा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेत शुभांगी पवार, अंजली शिंदे, मोनिका निकम (जगताप), अर्चना कुकडे, केतकी चव्हाण, ज्योती दुबे, श्रावणी बॅनर्जी, भाग्यश्री केळकर यांचा समावेश होता.


