Maoists Killed : तेलंगणाच्या मुलुगु जिल्ह्यातील तेलंगणा-छत्तीसगड सीमेवरील करेगुट्टा जंगलाखालील डोलिजेला वन क्षेत्रात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी (Maoists killed) ठार झाले आहेत. वरिष्ठ माओवादी नेते त्यांच्या पथकासह करेगुट्टा वनक्षेत्रात आश्रय घेत असल्याची गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. या चकमकीत मारल्या गेलेल्यांमध्ये वरिष्ठ माओवादी नेते आणि क्षेत्र समिती सदस्यांचा समावेश आहे. गोळीबारात पाचपेक्षा जास्त माओवादी मृत्युमुखी पडले आहेत. परंतु मृतांची अधिकृत ओळख अद्याप पटलेली नाही. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा वनक्षेत्रात डीआरजी (जिल्हा राखीव रक्षक), बस्तर फायटर्स, कोब्रा, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि एसटीएफ यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ‘ऑपरेशन कागर-२’ या नावाने शोध मोहीम सुरू केली. आदिवासी वस्त्यांसह जंगली भागात सुरक्षा दलांनी शोध मोहीम तीव्र केल्याने, मुलुगुच्या एजन्सी क्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. त्यानंतरच्या चकमकीत पाच माओवादी ठार झाले.