Priyanka Satra : मालाड अपघातातील वकिलाचा दुर्दैवी अंत; आईला अखेरचा निरोप देताना चिमुकल्यांचा टाहो, जखमी अवस्थेत पती व्हीलचेअरवर स्मशानभूमीत
Priyanka Satra : अंत्यसंस्कारावेळी मुलांनी आईच्या आठवणीने केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

Priyanka Satra : मुंबईतील मालाड परिसरात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात ॲडव्होकेट प्रियांका सत्रा (वय ३४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रविवारी रात्रीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रियांका यांच्या पश्चात पती मयांक सत्रा, आठ वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. आईच्या अचानक जाण्याने दोन्ही चिमुकल्यांवर मोठा आघात झाला आहे. अंत्यसंस्कारावेळी मुलांनी आईच्या आठवणीने केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
दरम्यान, अंत्यसंस्कारापूर्वी पत्नीचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी प्रियांका यांचे पती मयांक सत्रा हे व्हिलचेअरवरून स्मशानभूमीत आले होते. गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी पत्नीचे अखेरचे दर्शन घेतले. पतीला व्हिलचेअरवरून अंत्यदर्शनासाठी आलेले पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले.
नेमकं काय घडलं?
मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एस. व्ही. रोड आणि मामलेदार वाडी रोड जंक्शन येथे रविवारी रात्री सुमारे आठ वाजता हा भीषण अपघात झाला. कृष्णा चमणकर (वय ७०) हे कार चालवत असताना अचानक त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर भरधाव कारने तीन रिक्षा आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली.
या दुचाकीवर ॲडव्होकेट प्रियांका सत्रा आणि त्यांचे पती मयांक सत्रा प्रवास करत होते. कारच्या धडकेत प्रियांका गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात मयांक सत्रा यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
या दुर्घटनेत रिक्षा आणि दुचाकीवरील मिळून एकूण सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर पोलिसांनी कारचालक कृष्णा चमणकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी कृष्णा चमणकर यांना बोरीवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
या भीषण अपघातामुळे एका कुटुंबाने आई आणि पत्नी गमावली असून, चिमुकल्या मुलांवर मातृछत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





