PM Modi on GDP: भारताची अर्थव्यवस्था सुसाट! ७.८% विकासदरावर मोदींचा जल्लोष ; राहुल गांधींचं नाव न घेता घणाघात
PM Modi on GDP: भारताच्या अर्थव्यवस्थेने ७.८ टक्क्यांचा विकासदर नोंदवत दमदार कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले.

PM Modi on GDP: भारताच्या अर्थव्यवस्थेने ७.८ टक्क्यांचा विकासदर नोंदवत दमदार कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले.
सोशल मीडियावर व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी भारतीयांच्या मेहनतीचे आणि सामूहिक सामर्थ्याचे कौतुक केले. याचवेळी देशाबाबत नकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्यांवर त्यांनी नाव न घेता निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्याचा रोख काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे.
‘भारत वेगाने प्रगती करत आहे’ PM Modi on GDP:
पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझ्या देशवासीयांचे खूप-खूप अभिनंदन. ७.८ टक्क्यांचा विकासदर संपूर्ण देशाला आनंद देणारा आहे. भारतीयांच्या दृढनिश्चयाला आणि कठोर परिश्रमाला मी सलाम करतो. हा विकासदर आपल्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडवतो.”
जगभरात युद्धजन्य परिस्थिती, विविध संकटे आणि पुरवठा साखळीतील अडथळे निर्माण झाले आहेत. कोविड-१९ महामारीनंतर जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता कायम आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारत वेगाने प्रगती करत असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले.
‘काही लोक निराशेच्या अंधारात’
याचदरम्यान पंतप्रधान मोदींनी देशातील काही विरोधकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले की, “देशातील काही लोक निराशेच्या अंधारात बुडाले आहेत. ते खोट्या बातम्या पसरवून निराशेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
मात्र, या सर्व अडथळ्यांवर मात करत भारताने ७.८ टक्क्यांचा विकासदर गाठला असल्याचे मोदी म्हणाले. देशाने ही विकासाची गती कायम ठेवली पाहिजे आणि त्यासाठी आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
7.8% growth.
Strong numbers.
Even stronger confidence. pic.twitter.com/ZVPpnAXrVU
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2026
राहुल गांधींवरही अप्रत्यक्ष टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत आहेत. नुकतेच त्यांनी ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत भाजप सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींचे नाव न घेता केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
‘व्होकल फॉर लोकल’चा मंत्र स्वीकारा PM Modi on GDP:
पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी देशवासीयांना ‘स्वदेशी’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’चा मंत्र स्वीकारण्याचे आवाहन केले. केवळ मौजमजेसाठी परदेशात प्रवास करणे किंवा परदेशात लग्न करण्याऐवजी भारतातच अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘मॅरी इन इंडिया’ या संकल्पनेवरही त्यांनी भर दिला.
याशिवाय अत्यंत आवश्यक नसल्यास सोने खरेदी टाळण्याचे आवाहनही मोदी यांनी केले. देशांतर्गत उत्पादन आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य दिल्यास भारत अधिक आत्मनिर्भर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू’
“स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर आपण जितका अधिक भर देऊ, तितका स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होईपर्यंत तरुण पिढीच्या हाती विकसित भारत सोपवण्याचा संकल्प मजबूत होईल,” असे मोदी म्हणाले.
आज भारतीयांनी केलेल्या कठोर परिश्रमातून देशाच्या तरुण पिढीची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे विकासाच्या या प्रवासात कोणतीही कसर सोडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
“आपली धोरणे योग्य आहेत आणि आपले हेतू उदात्त आहेत. १.४ अब्ज भारतीयांची सामूहिक शक्ती देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी एकवटली आहे. चला, या यशाचा उत्सव साजरा करूया, नवा संकल्प करूया आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी एकजुटीने पुढे जाऊया,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.





