पौड : चांदणी चौक-मुळशी-ताम्हिणी महामार्ग हा मुळशी तालुक्याची लाईफलाइन मानला जातो. मात्र भूगाव गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून स्थानिक नागरिकांसह प्रवाशांचे हाल होत आहेत. शनिवार-रविवार या दिवशी कोकणात जाणाऱ्या वाहनांची वाढलेली संख्या आणि पुलाचे सुरू असलेले काम यामुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते. भुकुम-माताळवाडी ते भूगाव हा अवघा दहा मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी नागरिकांना तब्बल एक तास वाहतूक कोंडीत अडकून बसावे लागते. याच कोंडीत आज एक रुग्णवाहिका अडकून राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त झाली. जीवितहानीची शक्यता उद्भवू शकणाऱ्या अशा परिस्थितीत अपुरा पोलिस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थापनाचा अभाव स्पष्टपणे जाणवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुलाचे काम सुरू असताना वाहने वेगळी मार्गरेषा किंवा तात्पुरता पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने कोंडी अधिक वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त वाढवणे, वाहतूक वळवण्यासाठी स्पष्ट सूचना फलक, तसेच पीक अवर्समध्ये ट्रॅफिक कंट्रोल वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. “भूगाव गावा जवळ पुलाचे काम सुरू असल्याने त्याठिकाणी जाणे-येणे कमी जागा मिळत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. सद्यस्थितीत वाहतूक पोलिस तैनात असून ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.” -दत्ता चासकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक