Pune: मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगरवरून औंध, सांगवी, चिंचवडकडे जाणारी वाहतूक वळविली, पर्यायी मार्ग पहा

पुणे – शिवाजीवर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरु असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात पिलर टाकण्यात येत आहे. यामुळे या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी लहान झाले आहेत. गणेशखिंड रस्ता, औंध रस्ता, बाणेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. यामुळे शिवाजीनगरवरून औंध, सांगवी, पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी कडे जाणाऱ्या मार्गात तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १० फेब्रुवारी पासून पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
वाहतूक वळविण्यात आलेले मार्ग आणि पर्यायी मार्ग –
-शिवाजीनगरकडून गणेशखिंड रोडने औंध, सांगवी, पिंपरी चिंचवड, हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी एबिल हाऊस येथून उजवीकडे वळण घेवून सरळ रेंजहिल्स, सिंफनी चौक मार्गे साई चौक खडकी, डॉ. आंबेडकर चौक बोपोडी सरळ स्पायसर चौक मार्गे ब्रेमेन चौकातुन इच्छित स्थळी जावे.
-औंध गावाकडून शिवाजीनगर व पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांनी ब्रेमेन चौकातुन डावीकडे वळण घेवून सरळ स्पायसर जंक्शन, डॉ. आंबेडकर चौक, साई चौक खडकी, रेंजहिल्स चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
-एबिल हाऊस चौकामध्ये रेंजहिल्सकडून येवून उजवीकडे वळण घेण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहिल.
-गणेशखिंड रोडवरील संगण्णा धोत्रे पथ जाणे-येणेस दुहेरी मार्ग सुरु राहिल.
– गणेशखिंड रोडवरवील खाऊ गल्ली मार्गे ओम सुपर मार्केट सर्कलकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक करण्यात आलेली आहे व सिम्बायोसिस कॉलेज कडून खाऊ गल्लीतुन गणेशखिंड रोडवर येण्यास बंदी राहिल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी संचेती हॉस्पिटल चौकामधून गणेशखिंड रोडने विद्यापीठ चौक, औंध रस्त्यावरून पिंपरी चिंचवड, हिंजवडी भागात जाणाऱ्या व या भागातून संचेतीकडे जाणाऱ्या लग्जरी बसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
– संचेती हॉस्पीटल चौकामधून गणेशखिंड रोडने विद्यापीठ चौक, औंध मार्गे पिंपरी चिंचवड, हिंजवडी या भागामध्ये जाणाऱ्या व पिंपरी चिंचवड, हिंजवडी भागामधून औंध रोडने पुणे विद्यापीठ चौकामधुन संचेती हॉस्पीटल चौकामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या लक्झरी बसेसना सकाळी ८ ते रात्री साडे दहा वाजे पर्यंत प्रवेश बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग:
– जुना पुणे मुंबई महामार्गावरुन हॅरीस ब्रिजमार्गे पुणे शहरामध्ये यावे व शहरामधुन जावे किंवा बायपास रोड मार्गे कात्रज खडी मशिन चौक मार्गे जावे किंवा यावे.





