पुणे जिल्हा | वाघोलीतील वाहतूक कोंडीबाबा एकत्रित बैठक घ्या

वाघोली, (प्रतिनिधी)- पुणे-नगर रोडवर वाघोलीत उबाळेनगर ते बकोरी फाट्यापर्यंत होणार्या दैनंदिन वाहतूक कोंडीवर सद्यस्थितीतील तात्पुरती उपाययोजना आणि दीर्घकालीन उपयोजना करण्याविषयी नियोजन व संबंधित विभागांची एकत्रित मिटिंग घ्यावी अशी मागणी श्री शिवछत्रपती प्रतिष्ठाण व वाघोलीतील नागरिकांनी पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून वाघोली गावामध्ये पुणे-नगर रोडला उबाळेनगर पासून ते बकोरी फाट्यापर्यंत मोठ्या प्रमाणात दैनंदिन वाहतूक कोंडी वाढतच आहे. नगररोड वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कर्मचार्यांवरही मोठ्या प्रमाणात याचा ताण येत आहे.
यासाठी महत्त्वाचे तात्पुरत्या व दीर्घकालीन उपायोजना या दोन विभागात वर्गीकरण करून नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी काही उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे. यासाठी वाहतूक विभागाने पाठपुरावा करून संबंधित विभागाची एकत्रित बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
वाहतूक विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र व्यवहार करून पाचशे मीटर अगोदर पासून डीमार्केशनचे दिशादर्शक फलक लावून घेण्यात यावे. उदा. नगरकडे जाणार्या गाड्या डाव्या बाजूने केसनंद, आव्हाळवाडीकडे वळणार्या गाड्या उजव्या बाजूने ठेवाव्यात.
पुण्याकडे जाताना देखील अशा प्रकारचे फलक संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून लावण्यात यावे तदनंतर चौकात लेन कटिंग कमी प्रमाणात होईल व वाहतूक कोंडी मध्ये वीस ते पंचवीस टक्केमध्ये घट येईल.
वाघोली गावामध्ये नगर रोडच्या कडेने असणार्या काही जागांमध्ये पार्किंग झोन तयार करून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केल्यास रोडला लागणार्या गाड्या त्या ठिकाणी लागतील व परिणामी वाहतूक कोंडी मध्ये घट होईल. यासाठी आपण पुणे महानगरपालिकेकडे पत्र व्यवहार करावा.
वाघोली गावातील सर्व शाळेमधील ट्रान्सपोर्ट विभागाच्या प्रतिनिधींना एकत्रितपणे बैठक घेऊन बोलावल्यास त्यांच्या वेळापत्रकानुसार वाहतुकीचे नियोजन करणे सोयीस्कर होईल व त्यांच्याकडून देखील काही वॉर्डन आपल्याला उपलब्ध करून घेता येतील व दैनंदिन मोठ्या प्रमाणात लहान व मोठ्या विद्यार्थ्यांना होणार्या त्रासापासून काही प्रमाणात सुटका होतील. आजमितीला वाघोलीमध्ये विद्यार्थ्यांचे स्कूल बस मध्ये जाण्या-येण्यातच काही तास जातात.
बीआरटी टर्मिनस वाघोली गावात असल्यामुळे महानगरपालिका व पीएमपीएल प्रशासनाशी संपर्क करून वॉर्डन घेण्यात यावे. त्यांच्या विभागाशी संपर्क करून त्यांच्याकडून कायमस्वरूपी वॉर्डन मुख्य चौकांमध्ये नेमल्यास आपल्याला वाहतुकीमध्ये दिलासा मिळेल.
सणसवाडी व रांजणगाव एमआयडीसी व्यापारी संघटनेची आपले विभागाकडून मिटिंग आयोजित करण्यात यावी, त्यांच्याही ट्रान्स्परेशनची योग्य प्रकारे हाताळल्यास वाघोली ग्रामस्थांना वाहनधारकांना आपण 25 ते 30 टक्क्यापर्यंत वाहतूक कोंडीतून लगेच दिलासा देऊ शकतो. यामुळे आपल्या विभागावर येणारा ताण देखील काही प्रमाणात कमी होईल.
पुणे नगर रोडला पर्याय डीपी रस्ता तयार करणे. त्याकरिता पुणे नगर रोडला पर्यायी डीपी रस्ते तेथील शेतकर्यांना योग्य तो मोबदला देऊन रस्ता करण्याविषयी आपण पुणे महानगरपालिका यांच्याकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरवठा करावा जेणेकरून मुख्य नगर रस्त्यावरचा ताण कमी होईल.
वाघोलीतील मुख्य चौकात भुयारी मार्ग प्रस्तावित करणे. याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपूल प्रस्तावित होता, त्यांनी आता तो एमएसआरडीसीकडे पाठवला आहे.
याची किंमत दिवसेंदिवस वाढत असून तो होईल का नाही? यावर शंका आहे. तरी आपण महानगरपालिकेकडे वाघेश्वर मंदिर चौक, आव्हाळवाडी फाटा आणि बकोरी फाटा या ठिकाणी साडेपाच मीटर उंचीचा भुयारी मार्ग प्रस्तावित केल्यास स्थानिक वाहतूक त्यामधून होईल व मुख्य रस्त्याला कोणतेही चौक जंक्शन न राहिल्यामुळे नगर रोडला कोणत्या प्रकारचे वाहतूक कोंडी न होता मुख्य रस्ता पूर्णपणे चालू राहील.





