पुणे | मध्यवर्ती भागात वाहतूक ब्लाॅक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दिवसभर पाऊस त्यातच धरणातून विसर्ग सुरू असल्यामुळे भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. त्यामुळे शहरातील मध्यवस्तीत बुधवारी दिवसभर कोंडी झाली. विशेषत: संध्याकाळी यामध्ये भर पडली. काम सुटल्यानंतर घराकडे जाणाऱ्यांना मनस्ताप सहन करत तास ते दोन तास अडकावे लागले.
खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला.
त्यामुळे डेक्कन, जंगली महाराज रस्ता, फर्गसन काॅलेज रस्ता, केळकर रस्ता, नदीपात्रातील रस्त्यांसह शिवाजीनगर आणि मधवर्ती पेठांतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. सकाळपासूनच दिवसभर हीच परिस्थिती होती. संध्याकाळी त्यात वाढ होत गेली. पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात येत होते. मात्र, यंत्रणा विस्कळीत झाली होती.
जलपर्णी वाहून आली
नदीत वाहणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आली. ही जलपर्णी भिडे पूल आणि वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका पूलावर अडकली होती. मात्र, पाण्याचा जोर वाढल्यानंतर जलपर्णी पुढे वाहून गेली.





