मुंबई – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे जागतिक शेअर बाजारामध्ये संमिश्र वातावरण आहे. अशा परिस्थितीत बुधवारी शेअर बाजाराचे निर्देशांक अल्प प्रमाणात वाढले. भारत – अमेरिका व्यापार करार बोलणीकडे गुंतवणूकदारांचे जास्त लक्ष असल्याचे दिसून येते. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 63 अंकांनी वाढून 82,634 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 16 अंकांनी म्हणजे 0.60 टक्क्यांनी कमी होऊन 25,212 अंकावर बंद झाला. महिंद्रा, टेक महिंद्रा, स्टेट बँक, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर ईटर्नल, सन फार्मा, टाटा स्टील, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. जागतिक बाजारातून संमिश्र संदेश आले. दक्षिण कोरिया, जपान, शंघाय आणि हाँगकाँग येथील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते. युरोपात नकारात्मक वातावरण होते. मंगळवारी अमेरिकेच्या शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले होते. भारताची स्थूल अर्थव्यवस्था कमालीची बळकट आहे. किरकोळ आणि घाऊक महागाई कमी आहे. व्याजदर कमी पातळीवर आहेत. पाऊस चांगला पडत आहे. त्याचबरोबर खनिज तेलाच्या किमती माफक आहेत. चालू खात्यावरील आणि वित्तीय तूट नियंत्रणात आहे. मात्र पहिल्या तिमाहीच्या ताळेबंदाबाबत गुंतवणूकदार साशंक आहेत. टीसीएस, एचसीएल टेक कंपन्यांनी नकारात्मक ताळेबंद जाहीर केले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सावध असल्याचे मत जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी व्यक्त केले. एकीकडे अमेरिका व्यापार विषयक बोलणी चालू करीत असताना तांबे, पोलाद इत्यादीवर आयात शुल्क एकतर्फी वाढवत आहे. त्याचबरोबर औषधावर आयात शुल्क वाढविण्यासाठी निर्णय घेतला जाणार आहे. या परिस्थितीचा अंदाज लागत नसल्यामुळे गुंतवणूकदार कुंपणावर बसून आहेत. दरम्यान अमेरिकेतील महागाई वाढत चालल्यामुळे तेथे व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली आहे.