Trade deficit: सप्टेंबरमध्ये व्यापार तूट 32.1 अब्ज डॉलरवर; सोन्याच्या आयातीचा परिणाम

नवी दिल्ली – सप्टेंबर महिन्यात भारताची निर्यात 6.74 टक्क्यांनी वाढून 36.38 अब्ज डॉलर झाली आहे. मात्र या महिन्यात आयातही 16.6 टक्क्यांनी वाढून 68.53 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. सप्टेंबर महिन्यातील भारताची व्यापारातील तूट अशा परिस्थितीत वाढून 32.1 अब्ज डॉलर या पातळीवर गेली आहे.
वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार या महिन्यात भारताची आयात सोने-चांदी, खते, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इत्यादीची आयात वाढल्यामुळे जास्त झाली आहे. विशेषतः महाग झालेल्या सोने व चांदीच्या आयातीमुळे एकूण आयात जास्त झाली आहे. सोने आणि चांदीची आयात कमी व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करण्याची शक्यता वाढली आहे.
एप्रिल -सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये भारताची निर्यात 3.02 टक्क्यांनी वाढून 220.12 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. तर या कालावधीत आयात 4.53 टक्क्यांनी वाढून 375 अब्ज डॉलर झाली असल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. एकूण जागतिक परिस्थिती पाहता भारताची आयात- निर्यात तुलनेने संतुलित असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.





