पुणे | अंगणवाडी केंद्रांतील लाभार्थींना खेळणी साहित्य

पुणे, (प्रभात वृत्तसेवा) – महिला व बाल विकास विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गतच्या अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना खेळणी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी ३३ कोटी १२ लाख रुपये खर्च रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
शून्य ते ६ वर्षे वयोगटातील बालके, तसेच किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता इत्यादी लाभार्थ्यांना लसीकरण, पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, पूर्व प्राथमिक शिक्षण, संदर्भ सेवा, आहार व आरोग्य शिक्षण आदी सेवा पुरविण्यात येतात. अंगणवाडीत येणाऱ्या ३ वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील बालकांकरिता अंगणवाडी केंद्रास आकार बाल शिक्षण क्रमामध्ये दिलेल्या वाचन, लेखन, गणन, पूर्वानुभव, कलानुभव, भाषानुभव, शारीरिक व विकासानुभव, परिसर परिचय व विज्ञानानुभव यावर आधारित खेळ व शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता राज्यातील १ लाख १० हजार ४८६ अंगणवाडी केंद्राना प्रतिअंगणवाडी ३ हजार रुपये याप्रमाणे पूर्व शालेय शिक्षणाकरिता निधी मंजूर आहे.
अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना खेळणी साहित्य देण्यासाठी ई-निविदा प्रकाशित केली असून, खेळणी साहित्य खरेदी करतांना ई-निविदेतील अटी व शर्तीची पूर्तता करण्याची, तसेच ई-निविदेत स्पष्ट केल्याप्रमाणे पुरवठा केला जाईल, याची दक्षता एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त यांनी घ्यावी लागणार आहे.
निधी शासनाच्या धोरणानुसार व कार्यपद्धतीनुसार, तसेच उपलब्धतेनुसार खर्च करणे आवश्यक राहील. खेळणी साहित्याचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यादृष्टीने स्वयंस्पष्ट माहिती अंगणवाडीतील नोंदवहीमध्ये उत्पादनाचा दिनांक , एकूण पुरवठा, एकूण उपयोग याबाबतची योग्य नोंद ठेवणेबाबत उचित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत. आदेशानुसार मागणीप्रमाणे केलेल्या गुणवत्तेनुसार प्रत्यक्षात पुरवठा झालेला आहे, याची खात्री झाल्यावरच जेवढ्या जिल्ह्यांचा पुरवठा पूर्ण झालेला असेल व त्यांची पुरवठा झाल्याची चलने प्राप्त झालेली असतील, त्या जिल्ह्यांची देयक अदा करण्यात येणार आहेत.

