टोयोटा कंपनीचा मेक इन इंडियावर भर कायम: वाहनांच्या सुट्या भागांची देशांतर्गत निर्मिती 92% पर्यंत वाढली

Toyota vehicle spare parts – टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीने ऑक्टोबर 1997 रोजी बंगळुरू येथे कामकाज सुरू केल्यापासून स्थानिक पातळीवर उत्पादन विकसित करण्यावर भर दिला आहे. सध्या स्थानिक पातळीवर इंजिन 87% पर्यंत, सुटे भाग 87% पर्यंत, ट्रान्समिशन यंत्रणा 89 टक्केपर्यंत, पोलाद खरेदी 92 टक्के पर्यंत, अॅक्सेल उत्पादन 65% पर्यंत होत असल्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.
स्थानीक मनुष्यबळ आणि स्थानिक सुट्या भागाचा वापर करून कंपनी आपली उत्पादने देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच जागतिक बाजारपेठेसाठी विकसित करीत आहे, असे कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक स्वप्नेश मारू यांनी सांगितले. यावेळी कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी, कार्यकारी उपाध्यक्ष बी पद्मनाभा, कार्यकारी उपाध्यक्ष जी शंकर व वरिष्ठ उपाध्यक्ष व मुख्य संपर्क अधिकारी सुदीप दळवी उपस्थित होते.
कंपनीतील पहिल्या प्लँटमधील उत्पादन क्षमता 1 लाख 32 हजार, दुसर्या प्लॅटमधील उत्पादन क्षमता 2 लाख 10 हजार युनिट प्रति वर्ष आहे. लवकरच तिसरा प्लँट उभारण्यात येत असून या प्लँटची क्षमता एक लाखापर्यंत असेल. या प्रकल्पातून 12 मॉडेलची निर्मिती केली जाते. यामध्ये इनोव्हा, हायक्रॉस, क्रिस्टा, फॉर्च्यूनर, लिजेंडर, वेलीफायर इत्यादी वाहनांचा समावेश आहे.
कंपनीने कर्नाटकमधील आपल्या प्रकल्पासाठी मनुष्यबळ विकसित करण्यासाठी वेगळा विभाग स्थापन केला आहे. यात गरीब आणि होतकरू तरुणांना प्रशिक्षण देऊन विकसित केले जाते. याचा उपयोग टोयोटो किर्लोस्कर कंपनीबरोबरच इतर उद्योगांनाही होत आहे.
कंपनीने पर्यावरण संतुलनासाठी स्थापनेपासूनच पुढाकार घेतला असून कमी कार्बन उत्सर्जित करणारी वाहने विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कंपनीने आपल्या प्रकल्पात वृक्षारोपण केले आहे.
पर्यावरण संतुलनाला मदत व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पर्यायी इंधनाची वाहने विकसित करण्यात येत आहेत. इलेक्ट्रिक, हायब्रीड, इथेनॉल, हायड्रोजन इत्यादी इंधनावर कंपनीने वाहने विकसित केली आहेत किंवा विकसित केली जात आहेत. त्यामुळे कंपनीने पर्यावरण प्रेमी ग्राहकांना विविध वाहनांचा पर्याय उपलब्ध केला आहे.
शेंद्रा येथे नवा प्रकल्प उभारणार –
कंपनीच्या वाहनांची मागणी वाढत आहे. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी आणि वेटिंग पिरिएड कमी करण्यासाठी कंपनी महाराष्ट्रातील शेंद्रा येथे नवीन प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यामुळे मराठवाड्यात नवीन प्रकल्प उभारला जाईल आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकणार आहे.





