Satara: पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई; मुंबईतील बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
Satara जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राला अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी पर्यटन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्य करून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Satara: महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची ओळख केवळ राज्य आणि देशापुरती मर्यादित न राहता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी आधुनिक मार्केटिंग, डिजिटल ब्रँडिंग आणि प्रभावी प्रचारावर भर देण्याच्या सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या २०२५- २६ मधील मार्केटिंग व ब्रँडिंग कामकाजाचा आढावा तसेच २०२६- २७ च्या कृती आराखड्याबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, उपसचिव संतोष रोकडे, उपसचिव विजय पोवार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, सहसंचालक संतोष जाधव, सहाय्यक संचालक रवींद्र पवार, सहाय्यक संचालक सुशील पवार, कार्यकारी अभियंता आकाश चकोर यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी २०२५- २६ या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या मार्केटिंग व ब्रँडिंग उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच आगामी २०२६- २७ मधील प्रचार, प्रसार, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर, नावीन्यपूर्ण विपणन संकल्पना आणि पर्यटन क्षेत्राच्या व्यापक प्रसिद्धीसाठी आखण्यात येणाऱ्या कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याचबरोबर महाराष्ट्राची समृद्ध पारंपरिक खाद्यसंस्कृती, लोकपरंपरा, कला आणि सांस्कृतिक वैभव यांचा प्रभावी प्रचार करून राज्याची वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन ओळख देश- विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्याच्या सूचना पर्यटन मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राला अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी पर्यटन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्य करून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे आणि नावीन्यपूर्ण प्रचार मोहिमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यटन ब्रँडला जागतिक स्तरावर अधिक बळकटी देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.





