Koyna Dam: कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेच इशारा, धरणातील पाणीसाठा ८१ टीएमसी पार; उद्यापासून विसर्ग सुरु
Koyna Dam धरणात सध्या २४,९३८ क्युसेक (२.१६ टीएमसी) इतकी पाण्याची आवक सुरु असून, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.

Koyna Dam: सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, धरणाचा साठा ८१.१२ टीएमसीचा टप्पा पार झाला आहे. वाढत्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर धरणातून उद्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय कोयना प्रशासनाने घेतला आहे.
धरणाची पाणीपातळी सध्या २१४२ फूट ०५ इंच (६५३.००९ मीटर) इतकी नोंदविण्यात आली असून, एकूण साठा ८१.१२ टीएमसी (७७.०७ टक्के) झाला आहे. त्यापैकी जिवंत साठा ७६ टीएमसी (७५.९० टक्के) आहे.
धरणात सध्या २४,९३८ क्युसेक (२.१६ टीएमसी) इतकी पाण्याची आवक सुरु असून, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कोयना येथे ७६ मिलिमीटर, नवजा येथे ३९४ मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे एकूण ३०३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुढील काळात धरणातील साठा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर उद्या दि. २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजता धरण पायथा वीजगृहाचे एक युनिट कार्यान्वित करून सुमारे १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व धरणात होणारी आवक लक्षात घेऊन या विसर्गात बदल होऊ शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोयना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर व कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी केले आहे.





