पुणे – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या पाठिशी नव्हता, त्यामुळेच भाजपला मोठा फटका बसल्याची चर्चा होती. त्यानंतर मात्र धडा घेऊन भाजपने रा. स्व. संघाच्या मार्गदर्शनानेच रणनीती आखत निवडणुका लढवल्या. संघाने ‘मायक्रो प्लॅनिंग’ केल्यानेच भाजप-महायुतीने हा मोठा विजय मिळवला, असे आता सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतरचा काळ भाजपसाठी कठीण मानला गेला. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा जोश भरण्याचे आव्हान भाजपसमोर होते. त्याच कामासाठी संघाने पुन्हा “दक्ष’ होत भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
रा. स्व. संघातील एका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार संघाच्या स्वयंसेवकांनी राज्यात ठिकठिकाणी सुमारे साठ हजार ठिकाणी बैठका घेतल्या. यामध्ये काही ठिकाणी मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनाही सहभागी करून घेण्यात आले. विशेषत: विरोधकांच्या “नॅरेटिव्ह’ला उत्तर देण्यासाठी सोशल मीडियासह तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला. गल्लोगल्ली व्हाॅट्स अॅप ग्रुप तयार करण्यात आले. त्याद्वारे दररोज ठराविक वेळी व्हिडिओ, टेम्प्लेट्स, अगदी थोडक्यात असलेले लेख पाठवले जात होते. तसेच विकास, हिंदुत्व या मुद्यांवर भर देत पोस्ट्स शेअर केल्या जात होत्या.
प्रत्यक्ष मतदानाच्या काही तास आधी स्वयंसेवकांनी नागरिकांच्या भेटी देत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचे आवाहन केले. पुणे शहराचा विचार करता विशेषत: कसब्यासारखा बालेकिल्ला पुन्हा भाजपच्या ताब्यात येण्यासाठी स्वयंसेवकांनी “डोअर टू डोअर’ प्रचार केला. तशीच रणनिती शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती आणि खडकवासला मतदारसंघांत राबवल्याचा फायदा झाला.
सहयोगी संघटनांचेही कार्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे व्हाॅट्स अॅप ग्रुप या निवडणूक कार्यात चांगलेच अॅक्टिव्ह होते. विश्व हिंदू परिषद, संस्कार भारती, राष्ट्रसेविका समिती, हिंदू जनजागृती समिती आदी संघटनांच्या सहकार्याने त्या-त्या घटकांत मंचाच्या माध्यमातून “प्रबोधन’ करण्यात आले. त्याचाही बराच फायदा महायुतीला या निवडणुकीत झाला.