Akhilesh Yadav : “भाषेच्या ज्ञानाची हीच अट इतर राज्यांनीही लागू केली तर काय होईल?” मराठी सक्तीला अखिलेश यादवांचा विरोध
Akhilesh Yadav : '...इतर कोणत्याही भाषा बोलणाऱ्यांचे एकही मत घेऊ नका'

Akhilesh Yadav : मुंबईत रिक्षाचालकांवर मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाला उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विरोध केला आहे. इतर राज्यांनीही जर अशीच स्थानिक भाषेची सक्ती केली तर काय होईल? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
“प्रत्येक राज्याच्या मातृभाषेचा आदर आणि संवर्धन केले पाहिजे, परंतु कोणत्याही भाषेचे राजकारण केले जाऊ नये. यामुळे देशाच्या भाषिक आणि भावनिक एकतेमध्ये दुरावा आणि परकेपणा निर्माण होतो. मुंबईत भाजपचे उत्तर भारतीय नेते आहेत का, की ते भ्रष्टाचारात अडकले आहेत? अशी भाषिक ज्ञानाची अट लादणे हे देशभरात व्यवसाय करण्याच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का?
जर असे असेल, तर ही अट मुंबईत कार्यरत असलेल्या परदेशी कंपन्यांनाही लागू केली पाहिजे, पण तसे होणार नाही, कारण पैशाचा हव्यास असलेला भाजप श्रीमंतांपुढे पायघडीसारखा पसरायला नेहमीच तयार असतो,” असे अखिलेश यादव यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हंटले आहे.
हर राज्य की मातृभाषा का सम्मान और उत्थान होना चाहिए लेकिन किसी भी भाषा का राजनीतिकरण नहीं होना चाहिए। इससे देश की भाषिक-भाविक एकता में दूरी और दुराव पैदा होता है।
मुंबई में भाजपा के उत्तर भारतीय नेता हैं या भ्रष्टाचार में लीन होकर ठंडे पड़े हैं।
क्या इस तरह की भाषा-ज्ञान की… pic.twitter.com/ZSZtlLYoqu
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 23, 2026
ऑटो-रिक्षावर बंदी घालण्याचा प्रयत्न?
भाजपचे संपूर्ण लक्ष गरीब, शोषित, वंचित आणि उपेक्षित लोकांवर आहे. एकीकडे भाजप सरकार नोकऱ्या देत नाही, तर दुसरीकडे ते कष्टाने आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांवर हल्ला करत आहे. यामागेही कमिशन मिळवण्याचा खेळ आहे का? भाजपला कमिशनचे आमिष दाखवून, मोठ्या गाड्यांच्या कंपन्या सर्वसामान्यांचे वाहन असलेल्या ऑटो-रिक्षावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून लोकांना मोठ्या कंपन्यांच्या महागड्या गाड्यांनी प्रवास करणे भाग पडेल, असा गंभीर आरोपही अखिलेश यादव यांनी केला आहे.
हीच अनिवार्य अट इतर राज्यांनीही लागू केली तर..
“जर एखाद्या राज्यात काम करण्यासाठी स्थानिक भाषेच्या ज्ञानाची हीच अनिवार्य अट इतर राज्यांनीही लागू केली तर काय होईल? प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित असतेच असे नाही आणि प्रत्येक व्यक्तीची भाषिक क्षमता नवीन भाषा लगेच शिकण्यासारखी नसते. जर ऑटो-रिक्षाचालक मानसिक दबावाखाली ऑटो चालवतील, तर हे ड्रायव्हरसोबतच प्रवाशांसाठीही घातक ठरू शकते,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
…इतर कोणत्याही भाषा बोलणाऱ्यांचे एकही मत घेऊ नका
जर असेच असेल, तर मुंबई-महाराष्ट्रातील भाजपने हे जाहीर करून टाकावे की ते हिंदी, ब्रज, बुंदेली, रोहेली-कौरवी, अवधी, भोजपुरी, मैथिली; हरियाणवी, गढवाली-कुमाऊंनी; मारवाडी, ढुंढाडी, मेवाती, माळवी, हाडोती, बागडी, शेखावाटी, मेवाडी; गुजराती, काठियावाडी, सुरती, चरोतरी, महसाणी; तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, तुळू, ओरिया, गंजामी, संबळपुरी-कोसली, बालेश्वरी देसिया; सिंधी, पंजाबी; काश्मिरी-कॉशुर, डोगरी, गोजरी, पहाडी, शिना, बाल्टी, लडाखी; आसामी, मणिपुरी-मेइतेइलोन, मिझो, कोकबोरोक, खासी, गारो, नागामी, बोडो, भिल्ली, गोंडी, कुडुख, मुंडारी, संथाली व इतर कोणत्याही भाषा बोलणाऱ्यांचे एकही मत घेणार नाहीत,” असा टोलाही अखिलेश यादव यांनी लगावला आहे. सरकाराने आपले मन आणि विचार दोन्ही मोठे ठेवले पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी शेवटी दिला आहे. Akhilesh Yadav
हेही वाचा:
Snake Bite: साप चावल्यानंतर रुग्णाला जागं का ठेवतात? जाणून घ्या डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला





