Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या ४ धावा काढत रचला नवा इतिहास
Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशी आता जगातील कोणत्याही एका टी-२० टूर्नामेंट किंवा मालिकेत सर्वाधिक धावा करणारा 'टीनएजर' (तरुण) खेळाडू बनला आहे.

Vaibhav Sooryavanshi World Record : भारतीय क्रिकेट क्षितिजावर सध्या एक नवा आणि लखलखता तारा चमकत आहे, ज्याचे नाव आहे वैभव सूर्यवंशी. राजस्थान रॉयल्सच्या या १५ वर्षीय स्फोटक फलंदाजासाठी आयपीएल २०२६ चा हा हंगाम विक्रमांचा राहिला आहे. आज २४ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या राजस्थानच्या अंतिम लीग सामन्यात वैभवला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो ६ चेंडूंत ४ धावा करून स्वस्तात बाद झाला. मात्र, या छोट्या खेळीदरम्यान त्याने क्रिकेट विश्वातील एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तो आता जगातील कोणत्याही एका टी-२० टूर्नामेंट किंवा मालिकेत सर्वाधिक धावा करणारा ‘टीनएजर’ (तरुण) खेळाडू बनला आहे.
देवदत्त पडिक्कलचा ‘तो’ मोठा रेकॉर्ड मोडला!
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीला हा जागतिक विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी अवघ्या दोन धावांची गरज होती. सामन्याच्या सुरुवातीलाच विल जॅक्सच्या चेंडूवर धाव घेत त्याने हा टप्पा पार केला आणि इतिहास रचला. यापूर्वी हा विक्रम भारताच्याच देवदत्त पडिक्कलच्या नावावर होता. पडिक्कलने २०१९/२० च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कर्नाटककडून खेळताना १२ सामन्यांत ५८० धावा कुटल्या होत्या. वैभवने आता पडिक्कलला मागे टाकत ५८० धावांचा आकडा पार करणारा जगातील एकमेव टीनएजर फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला आहे.
१४ सामन्यांत ५८३ धावा; २३२ चा चक्रावून टाकणारा स्ट्राईक रेट!
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ च्या १४ सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना तब्बल ५८३ धावा ठोकल्या आहेत. या हंगामात त्याच्या बॅटमधून १ वादळी शतक आणि ३ आकर्षक अर्धशतके पाहायला मिळाली आहेत. सर्वात विशेष बाब म्हणजे, वैभवने या धावा २३२.२७ च्या अवाढव्य स्ट्राईक रेटने केल्या आहेत, जो या हंगामातील टॉप-१० फलंदाजांमध्ये सर्वात जास्त आहे. यासह तो राजस्थान रॉयल्ससाठी यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे.
१०० हून अधिक बाउंड्रीज; ५१८ धावा फक्त चौकार-षटकारांनी!
वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचे आणखी एक थक्क करणारे वैशिष्ट्य म्हणजे, त्याने आपल्या एकूण ५८३ धावांपैकी ५०० हून अधिक धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने वसूल केल्या आहेत. या संपूर्ण हंगामात त्याने ५० चौकार आणि ५३ गगनचुंबी षटकार लगावले आहेत. म्हणजेच त्याने ५१८ धावा फक्त बाउंड्रीजमधून केल्या आहेत. एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ख्रिस गेलनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर, तर सर्व भारतीय फलंदाजांमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.





