Vaibhav Sooryavanshi Record : फलंदाजीत अपयशी, पण मैदानात चित्ता! वैभव सूर्यवंशीने क्षेत्ररक्षणात मोडला ८ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक रेकॉर्ड
Vaibhav Sooryavanshi Record : फलंदाजीत अपयशी ठरलेल्या वैभवने नंतर क्षेत्ररक्षण करताना मैदानात असा काही पराक्रम केला, ज्याच्या जोरावर त्याने आयपीएलच्या इतिहासातील एक मोठा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.

Vaibhav Sooryavanshi Catch Record IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामात सध्या एकाच खेळाडूची सर्वाधिक चर्चा आहे, तो म्हणजे राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षांचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी. मुंबई इंडियन्सचा ३० धावांनी पराभव करत राजस्थान रॉयल्सने प्ले-ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात फलंदाजीत वैभव केवळ ४ धावा करून स्वस्तात बाद झाला आणि चाहत्यांची निराशा झाली. मात्र, फलंदाजीत अपयशी ठरलेल्या वैभवने नंतर क्षेत्ररक्षण करताना मैदानात असा काही पराक्रम केला, ज्याच्या जोरावर त्याने आयपीएलच्या इतिहासातील एक मोठा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात लहान वयात कॅच घेणारा क्षेत्ररक्षक!
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण केले होते, परंतु चालू हंगामात राजस्थानने त्याला बहुतांश सामन्यांमध्ये केवळ ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून वापरले होते, ज्यामुळे त्याला क्षेत्ररक्षणाची संधी मिळाली नव्हती. मात्र, मुंबईविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने रणनीती बदलली आणि यामुळे वैभवला पूर्णवेळ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरण्याची संधी मिळाली.
मुंबई इंडियन्सच्या डावातील चौथ्या षटकात नांद्रे बर्गरच्या दुसऱ्या चेंडूवर रेयान रिकल्टनने मिडविकेटच्या दिशेने हवेत शॉट मारला. तिथे क्षेत्ररक्षणासाठी सज्ज असलेल्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने कोणतीही चूक न करता एक अप्रतिम झेल टिपला. हा कॅच घेताच वैभव आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात कॅच पकडणारा खेळाडू बनला आहे. यासह त्याने अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानचा ८ वर्षांपूर्वीचा (२०१८ मधील) रेकॉर्ड मोडला, ज्याने १७ साल १६ दिवस वयात कॅच घेतला होता.
आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात कॅच घेणारे टॉप ५ फील्डर:
- वैभव सूर्यवंशी – १५ वर्ष ५८ दिवस (साल २०२६, विरुद्ध मुंबई इंडियन्स)
- मुजीब उर रहमान – १७ वर्ष १६ दिवस (साल २०१८, विरुद्ध आरसीबी)
- रियान पराग – १७ वर्ष १६३ दिवस (साल २०१९, विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स)
- प्रदीप सांगवान – १७ वर्ष १८१ दिवस (साल २००८, विरुद्ध मुंबई इंडियन्स)
- वॉशिंग्टन सुंदर – १७ वर्ष २०१ दिवस (साल २०१७, विरुद्ध मुंबई इंडियन्स)
ख्रिस गेलचा ‘तो’ अवाढव्य वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी!
राजस्थान रॉयल्सचा संघ आता ‘एलिमिनेटर’ सामन्यात पोहोचल्यामुळे वैभव सूर्यवंशीकडे ख्रिस गेलचा एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी अजूनही कायम आहे. वैभवने आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत तब्बल ५३ षटकार ठोकले आहेत. आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक ५९ षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या (२०१२ हंगाम) नावावर आहे. २७ मे रोजी मुल्लानपूर येथे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात वैभवने आणखी ७ षटकार मारल्यास, तो ख्रिस गेलला मागे टाकत एक नवा इतिहास रचेल.





