Top 10 News : आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार, शिंदेंच्या आमदाराने कंत्राटदाराकडून ४० लाखांची लाच घेतली? आणि भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News :

आता राज ठाकरे संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात जाणार
Top 10 News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई पूर्व उपनगरच्या दौऱ्यावर आहेत. पूर्व उपनगरात दोन शाखांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10 वाजता विक्रोळी येथील म्युन्सिपल कॉलोनी येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. मनसेचा मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेत नुकतच बंड झालं. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे सेनेत प्रवेश केला. या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईमध्ये दौरा केला होता. अशातच आज राज ठाकरे ही बंडखोर खासदार संजय पाटील यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. मुंबई पदाधिकाऱ्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी खासदारांचे पक्षांतर यावरून चांगलीच टीका केली. त्यामुळे आज राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष असेल.
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट;
शेगाव मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांवर FDA ची धाड
राज्यात अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कारवाईचा धडाकाच पाहायला मिळत आहे. आधी गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांवर कारवाई केल्यानंतर, मुंढेंनी आपला मोर्चा हॉटेल व्यवसायिकांकडे वळवला आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हॉटेल व्यवसायिकांना किचनसंदर्भात नियमांची उजळणी करुन दिली. तर, देवस्थानच्या ठिकाणी असलेल्या पेढा, प्रसाद विक्रीच्या दुकानांवरही आता लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात संत गजानन महाराज मंदिर परिसरातील उघड्यावर विक्री केल्या जाणाऱ्या प्रसाद आणि पेढे विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून कारवाई केली आहे. त्यामुळे, आता मंदिर परिसरातही तुकाराम मुंढेंचा इम्पॅक्ट जाणवतोय.
केतन अग्रवालच्या कुटुंबाला कँडल मार्चमध्ये अश्रू अनावर;
सिया-चेतनचं कृत्य पाहणाऱ्यांनी पुढं यावं-विशाल अग्रवाल Top 10 News :
केतन अग्रवालची हत्या लोहगडावर 18 जूनला त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केली होती. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी केतन अग्रवालच्या कुटुंबीयासह नागरिकांनी लोणावळ्यात कँडल मार्च काढला होता. या मोर्चात केतन अग्रवाल याच्या आई वडिलांना लेकाच्या आठवणीत अश्रू अनावर झाले.केतन अग्रवालला न्याय मिळावा या मागणी साठी काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते.केतन अग्रवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याच्या राहत्या लोढा सोसायटीतील रहिवाशी एकवटलेत. लोहगडावर केतन अग्रवालची हत्या झाली. तेव्हा जे घटनास्थळी हजर होते, ज्यांनी केतनला दरीत ढकलून देताना पाहिलं, त्यांनी पुढं येण्याचं आवाहन विशाल अग्रवाल यांनी केलं आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरीचे हे कृत्य समोर आणण्यासाठी त्या साक्षीदारांनी पुढं यावं. त्यांना कोणताही त्रास होऊ देणार नाही, असं मी त्या साक्षीदारांना आश्वस्त करतो,असं केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी केली
आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली,
दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार
शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. रविवारी राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. मात्र, भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत परीक्षेपूर्वी मुख्य पेपर मधील प्रश्न फोडण्यात आले आणि एकच खळबळ उडाली. या प्रकरणात तीन जणांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या मागे दिल्ली कनेक्शन असल्याचं उघडकीस आलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल ४ लाख २८ हजार १२२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. आज या परीक्षेचा पेपर होणार होता. मात्र काल भिवंडी याचा पेपर फुटल्यानं ४ लाख २८ हजार १२२ परीक्षार्थींना याचा फटका बसलाय.दरम्यान, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय.
शिंदेंच्या आमदाराने कंत्राटदाराकडून ४० लाखांची लाच घेतली? Top 10 News :
व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी हा गंभीर आरोप केलाय. एका व्यावसायिकाकडून तब्बल ४० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा रविकिरण इंगवले यांनी केला. यासंदर्भातील पैशांच्या कथित देवाणघेवाणीच्या संभाषणाचा व्हिडिओ पत्रकार परिषदेत प्रसारित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही इंगवले यांनी केली. दरम्यान, या आरोपांवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी इंगवले हे ब्लॅकमेलर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.तर ठाकरे गटाकडून या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्यात आलंय. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्हिडिओची SIT नेमून चौकशी करावी, त्याचबरोबर क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करावी आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आलीय.
राज्यात वादळी पावसाचा इशारा;
विदर्भ आणि कोकणात ‘येलो-ऑरेंज’ अलर्ट
मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे, पण मागील चार दिवसांपासून वाटचाल सध्या काहीशी संथ सुरू आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सूम गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दिशेने वेगाने पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. सध्या मॉन्सूनची सीमा सुरत, इंदूर आणि मोतिहारी या भागातून जात आहे. दरम्यान, आज राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून, येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
अयोध्येतील राम मंदिरातून २०० किलो चांदीच्या विटा गायब?
राम मंदिर ट्रस्टचा मोठा खुलासा
अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित देणग्यांच्या अपहार प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा होत आहे. श्रीराम मंदिरात भाविकांकडून अर्पण केल्या गेलेल्या २०० किलो चांदीच्या विटा गायब झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली होती. या आरोपांवर आणि देणग्यांच्या अपहार प्रकरणावर आता पहिल्यांदाच श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अधिकृत एक निवेदन जारी करत स्पष्टीकरण दिलंय. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने, भाविकांनी दान केलेले सर्व दागिने, चांदीच्या विटा आणि इतर वस्तू सुरक्षित आहेत.तसेच समोर आलेल्या घटनांमुळे आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही अत्यंत दुःखी झालो आहोत. मात्र, भविष्यात अशी दुर्दैवी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आम्ही आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासन देत आहोत.”असे निवेदनात म्हटले आहे.
“इराणचे अस्तित्व मिटवून टाकू!”
डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
पश्चिम आशियातील युद्धाचे ढग पुन्हा एकदा गडद झाले असून, अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या शांतता कराराला केराची टोपली दाखवत इराणने व्यापारी जहाजांवर पुन्हा ड्रोन हल्ले केले होते. आता या कारवाईला अमेरिकेनं प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी इराणच्या लष्करी तळांवर आणि किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर सलग दुसऱ्या दिवशी भीषण बॉम्बहल्ला केला. या लष्करी कारवाईनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणचे अस्तित्वच संपवून टाकण्याचा आक्रमक इशारा दिला आहे, तर इराणनेही अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा केली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने;
पराभवानंतरही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते?
सध्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाची धूम सुरू आहे. या स्पर्धेला ११ जूनपासून सुरुवात झाली असून आज भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने विश्वचषकाची सुरुवात दमदार केली होती.पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने उपांत्य फेरीसाठी मजबूत दावेदारी निर्माण केली होती. मात्र, मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. आता आज लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होत असून, या सामन्यावर भारतीय संघाचे सेमीफायनलचे भवितव्य अवलंबून आहे. भारताला आज पराभवाचा सामना करावा लागला, तर स्पर्धेबाहेर पडण्याचा मोठा धोका आहे. मात्र, पराभवानंतरही भारताकडे उपांत्य फेरी गाठण्याची एक तांत्रिक संधी कायम राहणार आहे.ती संधीदक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशच्या सामन्यावर अवलंबून असणार आहे.
“आम्ही घटस्फोट घेतोय”;
गौरव खन्नाच्या पत्नीचा शोमध्ये खुलासा Top 10 News :
बिग बॉस १९ चा विजेता गौरव खन्ना व त्याची पत्नी आकांक्षा चमोला घटस्फोट घेत आहेत. स्वतः आकांक्षाने हा खुलासा केला आहे. दोघेही वर्षभरापासून वेगळे राहत असून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचं आकांक्षाने ‘लॉक अप २’ या शोमध्ये सांगितलं. गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांच्या घटस्फोटाच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून येत होत्या, पण दोघांनीही या बातम्या फेटाळल्या होत्या. पण आता आकांक्षा चमोलाने स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘लॉक अप २’ हा रियलिटी शो नेटफ्लिक्सवर सुरू झाला असून त्याचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आहे. यामध्ये सर्व स्पर्धकांची ओळख करून देण्यात आली. या शोच्या स्पर्धकांपैकी एक आकांक्षा चमोला देखील आहे. शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये सर्वांना मोठा धक्का बसला. कारण आकांक्षाने सांगितलं की ती व तिचा पती गौरव खन्ना घटस्फोट घेत आहेत. मागच्या एकवर्षापासून ते एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचेही तिनं सांगितलं. आकांक्षा चमोलाने हा धक्कादायक खुलासा केल्यावर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.




