Top 10 News : अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या मैदानात ते अमेरिका-इराण संघर्ष तीव्र…; वाचा आजच्या टॉप १ ० बातम्या
Top 10 News : अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या मैदानात ते अमेरिका-इराण संघर्ष तीव्र...; वाचा आजच्या टॉप १ ० बातम्या

Top 10 News : १) अण्णा हजारे पुन्हा आंदोलनाच्या मैदानात; विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ दोन तासांचे मौन आंदोलन
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या मैदानात उतरणार आहेत. गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारकात ते दोन तासांचे मौन आंदोलन करणार आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा आणि लोकशाहीत संवादाला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका अण्णा हजारे यांनी मांडलीय. आंदोलनस्थळाला प्रतीकात्मक स्वरूपात “नगरचे जंतर-मंतर” असे नाव देण्यात येणार आहे. अण्णा हजारे दीर्घ काळानंतर आंदोलन करत असल्याने या कार्यक्रमाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले असून, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. (Top 10 News)
२) कर्जमाफीला सुरुवात; 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 553 शेतकऱ्यांची यादी जाहीर केलीय. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, या योजनेसाठी 40,980 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या यादीत अमरावती, लातूर, नागपूर, पुणे, सातारा आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकांतील लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांचे 2.99 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी ‘आपले सरकार’ केंद्रावर आधार प्रमाणीकरण करून कर्जाची माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सरकारने दिली. (Top 10 News)
३) भाजप आमदाराची भास्कर जाधवांना खुली ऑफर; कोकणच्या विकासासाठी सत्तेत या
कोकणातील राजकारणात मोठी चर्चा रंगलीय. भाजप आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे आमदार भास्कर जाधव यांना थेट सत्तेत येण्याची ऑफर दिलीय. चिपळूणमधील एका कार्यक्रमानंतर बोलताना जठार म्हणाले, “कोकणाला तुमची गरज आहे, तुम्ही आमच्यासोबत या.” त्यांनी भास्कर जाधव यांना त्यांच्या पक्षात योग्य संधी मिळत नसल्याचा दावा करत विरोधी पक्षनेतेपदही न मिळाल्याचा उल्लेख केला. कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकत्र वृक्षारोपण केले आणि गळाभेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. काही दिवसांपूर्वी एकमेकांवर टीका करणारे हे दोन्ही नेते आता एकाच व्यासपीठावर दिसल्याने कोकणातील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झालीय. (Top 10 News)
४) चंद्रपूर काँग्रेसमध्ये धानोरकर गटाची सरशी; गटनेतेपदी सुरेंद्र अडबाले
चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदाचा अनेक महिन्यांपासून सुरू असलेला वाद अखेर संपला आहे. विभागीय आयुक्तांनी राजेश अडूर यांची गटनेतेपदावरील नोंद रद्द करत सुरेंद्र अडबाले यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे खासदार प्रतिभा धानोरकर गटाला मोठे यश मिळाले असून आमदार विजय वडेट्टीवार गटाला राजकीय धक्का मानला जात आहे. धानोरकर समर्थक 16 नगरसेवकांनी बहुमताचा दावा करत गटनेते बदलाचा ठराव विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. दोन्ही बाजूंची सुनावणी झाल्यानंतर हा निर्णय देण्यात आला. या घडामोडीनंतर चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत सत्तासंघर्षाला नवे वळण मिळाले असून धानोरकर गटाचे महापालिकेतील राजकीय वर्चस्व अधिक मजबूत झाल्याची चर्चा सुरू आहे. (Top 10 News)
५) दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथा यांचं वादग्रस्त विधान
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केलेत. भाजपच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी, “दलित, वंचित आणि शेतकऱ्यांना भडकवण्यात अपयश आल्यानंतर आता विद्यार्थ्यांना लक्ष्य केलं जातंय,” असं विधान केले. तसेच, सध्याच्या आंदोलनामागे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची जुनी रणनीती असल्याचा दावाही त्यांनी केलाय. आरक्षण आणि संविधानाबाबत विरोधकांनी अफवा पसरवल्याचाही आरोप त्यांनी केलाय. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. (Top 10 News)
६) विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सरन्यायाधीशांची टिप्पणी; “आमचा वेळ वाया घालवू नका”
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कठोर टिप्पणी केली. याचिकाकर्त्यांचे वकील नरेंद्र मिश्रा यांनी NEET परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, सरन्यायाधीशांनी “आमचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका” असे सांगत याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच कथित लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासही त्यांनी नकार दिला. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयानेही याच प्रकरणातील तातडीच्या सुनावणीची मागणी फेटाळली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राजधानीतील राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आलाय. (Top 10 News)
०७) अमेरिका-इराण संघर्ष तीव्र; तेलाचे दर वाढले, भारतावर परिणामाची शक्यता
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला असून अमेरिकेने इराणमधील पाच शहरांवर हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आलीय. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनुसार, होर्मुज सामुद्रधुनीतील व्यापारी जहाजांना धोका निर्माण करण्याची इराणची क्षमता कमी करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली. दुसरीकडे, इराणने होर्मुज खाडी परिसरात सुरक्षा उपाय अधिक कडक केले आहेत. या तणावामुळे जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल 91 डॉलरपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. होर्मुज मार्गातून भारतात मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि एलपीजीची आयात होत असल्याने या संघर्षाचा परिणाम इंधनाच्या किमतींवर आणि पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Top 10 News)
८) मारुती सुझुकीचा ग्राहकांना झटका; ऑगस्टपासून कारच्या किंमती 30 हजारांपर्यंत महाग
देशातील आघाडीची वाहन उत्पादक मारुती सुझुकी इंडियाने आपल्या सर्व कारच्या किंमती ऑगस्ट 2026 पासून 30 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कच्चा माल, वाहतूक आणि उत्पादन खर्चात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव खर्चाचा काही भाग ग्राहकांवर टाकणे अपरिहार्य झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. ही दरवाढ प्रत्येक मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार वेगवेगळी असेल. दरवाढीच्या घोषणेनंतर शेअर बाजारातही मारुती सुझुकीच्या समभागांमध्ये तेजी दिसून आली. त्यामुळे ऑगस्टनंतर नवी मारुती कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार असून, वाहन खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची घडामोड ठरणार आहे. (Top 10 News)
९) मेघा धाडेंचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
दिल्लीतील CJP आंदोलनावरून अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ विजेती मेघा धाडे हिने सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केलीय. आंदोलनावर टीका करत तिने सरकारच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केले. एका पोस्टमध्ये “मी झुरळांऐवजी सिंहाला पाठिंबा देणारी आहे” अशी प्रतिक्रिया देत तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा दर्शवला. तसेच, “भाजपला विरोध करणे म्हणजे देशद्रोह नाही, पण देशद्रोहींना पाठिंबा देऊन भाजपला विरोध करणे देशद्रोह आहे,” असा मजकूर असलेली पोस्टही तिने शेअर केलीय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सुरू असलेल्या वादात तिच्या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून समर्थक आणि विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. (Top 10 News)
१०) दारू पिऊन कार चालवणं डेव्हिड वॉर्नरला भोवलं; ९ महिन्यांच्या तुरुंगवासाची टांगती तलवार!
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हिड वॉर्नर दारू पिऊन कार चालवल्याप्रकरणी मोठ्या संकटात सापडला आहे. सिडनीच्या कोर्टात वॉर्नरने स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे. ५ एप्रिल रोजी तपासणीदरम्यान वॉर्नरच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा दुप्पट आढळले होते. या गुन्ह्यासाठी वॉर्नरला १८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत ६ महिन्यांची ड्रायव्हिंग बंदी, दंड किंवा जास्तीत जास्त ९ महिन्यांची जेलची शिक्षा होऊ शकते. या वादामुळे बिग बॅश लीगमधील सिडनी थंडरचे कर्णधारपदही त्याच्या हातातून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (Top 10 News)




