Rohit Pawar : गैरहजर असल्याने नाराज असल्याची चर्चा! रोहित पवारांनी दिलं स्पष्टीकरण म्हणाले “सरकारविरोधात आम्ही ठाम..”
Rohit Pawar : या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांची गैरहजेरी विशेष चर्चेचा विषय ठरली. यावर रोहित पवारांनी स्पष्टीकर दिले आहे.

Rohit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार तब्बल ३४ वर्षांनंतर अधिवेशनाच्या काळात बुधवारी विधिमंडळात दाखल झाले. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकार समितीच्या बैठकीसाठी ते विधानभवनात आले होते. त्यांच्या आगमनावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांची भेट घेतली.
मात्र, या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांची गैरहजेरी विशेष चर्चेचा विषय ठरली. एकीकडे भाजप नेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात झालेल्या कथित भेटीनंतर शरद पवार गट महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अशातच रोहित पवार बैठकीला उपस्थित नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
हेही वाचा : Hingoli : हिंगोलीकरांची झोप उडाली! दोन तासांत चार भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
रोहित पवार यांच्याकडून स्पष्टीकरण
या चर्चांवर अखेर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “डोंबिवलीतील एका सरकारी रुग्णालयात शिंदे गटाच्या नगरसेवकाने डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याच्या घटनेनंतर संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी आपण घटनास्थळी गेलो होतो, त्यामुळे विधानभवनात वेळेत पोहोचता आले नाही.” असे त्यांनी सांगितलं.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, “सरकारविरोधात आम्ही ठाम भूमिका घेत आहोत. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच निर्माण होत नाही. शिक्षक आणि एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबतही मी शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. माझ्या अनुपस्थितीचं कारण त्यांना माहिती आहे.”
तर्क-वितर्कांना उधाण
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रोहित पवार राज्यभर विविध जनआंदोलनांमध्ये सक्रिय असून सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे भविष्यात शरद पवार गटाने महायुतीत प्रवेश केल्यास रोहित पवार यांच्या राजकीय भूमिकेवर आणि भविष्यातील स्थानावर काय परिणाम होईल, याबाबतही राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
हेही वाचा : Satara Water Supply: धरण उशाला, कोरड घशाला! कास तलाव भरला तरी पश्चिम सातारा तहानलेला…कारण काय?





