Shekhar Suman : फक्त 24 तासच भाजपमध्ये राहिले; अखेर शेखर सुमन यांनी सांगितलं पक्ष सोडण्यामागचं कारण
Shekhar Suman : 'शेखर टुनाईट' या कार्यक्रमाच्या लाँचदरम्यान बोलताना शेखर सुमन यांनी आपल्या अल्पकाळाच्या राजकीय प्रवासाबद्दल भाष्य केलं.

Shekhar Suman : चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेते शेखर सुमन यांनी एकेकाळी भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, अवघ्या २४ तासांतच त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. आता अनेक वर्षांनंतर त्यांनी त्या निर्णयामागील कारण उघड केलं आहे.
‘शेखर टुनाईट’ या कार्यक्रमाच्या लाँचदरम्यान बोलताना शेखर सुमन यांनी आपल्या अल्पकाळाच्या राजकीय प्रवासाबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले की, ते फक्त २४ तासांसाठीच राजकारणी होते. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
का घेतला होता निर्णय?
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शेखर यांनी सांगितलं की, त्या काळात त्यांच्या आयुष्यात काही अशा परिस्थिती निर्माण झाल्या होत्या, ज्यामुळे ते स्वतःला अडचणीत आणि कोपऱ्यात ढकललं गेल्यासारखं समजत होते. त्याच भावनेतून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय फारसा विचारपूर्वक घेतलेला नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, ‘शेखर टुनाईट’च्या पहिल्या भागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांना शोमध्ये आणणं भाजपशी असलेल्या पूर्वीच्या संबंधांमुळे सोपं झालं का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शेखर यांनी मिश्कीलपणे उत्तर देत सांगितलं, “मी फक्त २४ तासांसाठी भाजपचा सदस्य होतो.”
राजकारणात प्रवेश करण्यामागील कारणाबाबत बोलताना ते म्हणाले, “कधीकधी आयुष्यात अशा परिस्थिती निर्माण होतात, ज्या तुमच्या नियंत्रणाबाहेर असतात. माझ्या आयुष्यातही दोन वेळा असं घडलं की, मला मनाविरुद्ध काही निर्णय घ्यावे लागले.”
यावेळी त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवल्याची आठवणही सांगितली. “निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नव्हती. आजही मला कळत नाही की मी तो निर्णय का घेतला. मात्र, तो केवळ एक पक्षप्रवेश होता, पूर्णवेळ राजकीय कारकीर्द नव्हती,” असेही शेखर सुमन यांनी स्पष्ट केले.
कोण आहेत शेखर सुमन?
शेखर सुमन हे अभिनेते, सूत्रसंचालक, गायक आणि निर्माते आहेत. त्यांनी हिंदी चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमीवर काम केले आहे. त्यांनी १९८० आणि १९९० च्या दशकात अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले. “देख भाई देख” या लोकप्रिय मालिकेमुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. “Movers & Shakers” हा त्यांचा टॉक शो खूप गाजला होता. त्यांनी अनेक रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन आणि परीक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यांचा मुलगा अध्ययन सुमन देखील अभिनेता आहे. अलीकडच्या काळात ते मनोरंजन क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि राजकीय विषयांवरील वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात.
हेही वाचा : Excessive Sleep: सतत झोप येतेय? शरीर थकल्यासारखं वाटतंय? वेळेत तपासणी करा… अन्यथा वाढू शकतो धोका!






