Politics News : संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी राजकीय हालचालींना वेग; शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून खासदारांना व्हीप जारी
Politics News : डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Politics News : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. डिलिमिटेशन (मतदारसंघांची पुनर्रचना) आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकांवरून राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी आपल्या खासदारांना व्हीप जारी केला आहे. अधिवेशनाच्या काळात सभागृहात उपस्थित राहून पक्षाची भूमिका मांडण्याचे निर्देश खासदारांना देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या विनंतीनुसार लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून, तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ३ डिसेंबरपर्यंत कामकाज चालण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे मुख्य प्रतोद खासदार श्रीरंग बारणे यांनी हा व्हीप जारी केला आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी २९ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत दिल्लीत पोहोचावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. शिवसेनेचे लोकसभेत १३, तर राज्यसभेत २ खासदार आहेत.
मुंबईत २८ नोव्हेंबरला महत्त्वाची बैठक –
विशेष अधिवेशनातील पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील नंदनवन येथे ही बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनातील पक्षाची भूमिका आणि संसदेतील कामकाजाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
आणखी कोणत्या पक्षांनी व्हीप जारी केला?
विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत पुढील पक्षांच्या हालचाली समोर आल्या आहेत.
– काँग्रेसने लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांना विशेष अधिवेशनासाठी दिल्लीत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत दिल्लीत पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.
-राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) : पक्षाचे मुख्य प्रतोद खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेतील आठही खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान सभागृहात उपस्थित राहून पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचे निर्देश दिले आहेत.
-शिवसेना (एकनाथ शिंदे गट) : पक्षाचे मुख्य प्रतोद श्रीरंग बारणे यांनी खासदारांना व्हीप जारी केला असून २९ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत दिल्लीत पोहोचण्यास सांगितले आहे.
दरम्यान, द्रमुक (DMK) आणि वायएसआर काँग्रेस (YSRCP) यांच्याबाबत विधेयकाला अटींसह पाठिंबा देण्याची चर्चा आहे.





