Abhijit Dipke : आंदोलनासाठी दिल्ली गाठली, पण घरातून आली दुःखद बातमी; अभिजीत दिपकेंच्या आजीचे निधन
Abhijit Dipke : हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी हे अभिजीत दिपके यांचं मूळ गाव आहे. त्यांच्या आजी सावित्रीबाई दिपके या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या.

Abhijit Dipke : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली विमानतळावर दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असतानाच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचं निधन झालं आहे. त्या ८५ वर्षांच्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी हे अभिजीत दिपके यांचं मूळ गाव आहे. त्यांच्या आजी सावित्रीबाई दिपके या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
आंदोलन सुरू असतानाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर
एकीकडे दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली, तर दुसरीकडे त्यांच्या आजीच्या निधनाची दुःखद बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईबाबत अभिजीत दिपके यांच्या वडिलांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या आईच्या निधनाचं वृत्त समोर आलं.
आजीच्या अंत्यसंस्कारासाठी अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्य हिंगोलीतील संतूक पिंपरी येथे रवाना होणार असल्याची माहिती आहे.
अभिजीत दिपके महाराष्ट्रात परतणार का?
आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके दिल्लीतील आंदोलन सोडून महाराष्ट्रात परतणार का, याकडे लक्ष लागलं आहे. मात्र, ते सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांना महाराष्ट्रात येता येणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या परिस्थितीत अभिजीत दिपके पुढे काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Abhijit Dipke : आंदोलनासाठी दिल्ली गाठली, पण घरातून आली दुःखद बातमी; अभिजीत दिपकेंच्या आजीचे निधन





