Shardul Jadeja Video : विकेट घेतल्यानंतर शार्दुलने डिवचलं; पण ‘त्या’ एका चुकीमुळे जडेजाने भर मैदानात उडवली खिल्ली, पाहा VIDEO
Shardul Jadeja Video : राजस्थानचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा आणि मुंबईचा अनुभवी गोलंदाज शार्दुल ठाकूर यांच्यातील मैदानातील वाद चिडवाचिडवीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shardul Thakur Ravindra Jadeja Funny Video Viral : आयपीएल २०२६ मधील ६९ व्या लीग सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ३० धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये धडक मारली. ज्यामुळे पंजाब किंग्ज आणि केकेआरचं प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं स्वप्न भंगलं. या हायव्होल्टेज सामन्यादरम्यान मैदानात कमालीचा रोमांच पाहायला मिळाला. विशेषतः राजस्थान रॉयल्सच्या डावातील शेवटच्या म्हणजेच २० व्या षटकात मैदानावर एक असा मजेशीर आणि अतरंगी प्रसंग घडला, ज्याने चाहत्यांचे तुफान मनोरंजन केले.
मैदानात नक्की काय घडलं?
झाले असे की, राजस्थान रॉयल्सच्या डावातील शेवटचे २० वे षटक मुंबई इंडियन्सकडून शार्दुल ठाकूर टाकत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर रवींद्र जडेजा स्ट्राईकवर होता. शार्दुलच्या या चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या नादात जडेजा बाद झाला. आपल्याच चेन्नईच्या माजी सहकाऱ्याची विकेट मिळाल्याचा आनंद शार्दुलला गगनात मावेनासा झाला. त्याने थेट जडेजाच्या समोर जात आक्रमकपणे विकेट सेलिब्रेट केली आणि जडूला चिडवण्यास सुरुवात केली.
The kind of banters we love to see 😂💙🩷#TATAIPL | #KhelBindaas | #MIvRR | @mipaltan | @rajasthanroyals pic.twitter.com/j9A7YIphGr
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2026
सायरन वाजला अन् खेळ पालटला; जड्डूचा ‘फ्री-हिट’वर बदला!
शार्दुल ठाकूर जडेजाला चिडवतच होता, तेवढ्यात अचानक स्टेडियममध्ये ‘नो-बॉल’चा सायरन वाजला. रिप्लेमध्ये स्पष्ट दिसले की, शार्दुलने गोलंदाजी करताना रेषेच्या पुढे पाय टाकला होता (ओव्हर स्टेपिंग). जसा नो-बॉलचा निर्णय आला, तसा रविंद्र जडेजाचा चेहरा आनंदाने फुलला. जड्डूने लगेच मैदानातून बाहेर जाण्याचा निर्णय बदलला आणि क्रीझवर परतताना शार्दुल ठाकूरला जोरदार प्रतिउत्तर देत डिवचले.
जडेजा एवढ्यावरच थांबला नाही; तर मिळालेल्या ‘फ्री हिट’च्या (Free Hit) चेंडूवर त्याने खणखणीत चौकार (फोर) ठोकला. त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरही जडेजाने पुन्हा एक शानदार चौकार वसूल केला. सलग दोन चौकार ठोकल्यानंतर जडेजाने अत्यंत मजेशीर हावभाव करत शार्दुल ठाकूरला मैदानातच चांगलेच सळो की पळो करून सोडले.
प्लेऑफचे चित्र झाले स्पष्ट; कोणाची कोणाशी होणार लढत?
गुणतालिकेतील अव्वल स्थानांमुळे ‘क्वालिफायर-१’ चा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाईल. तर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहिलेला राजस्थान रॉयल्सचा संघ आता ‘एलिमिनेटर’ सामन्यात सनरायझर्स हैदराबादशी (SRH) भिडणार आहे. ‘क्वालिफायर-१’ चा सामना २६ मे रोजी होणार असून एलिमिनेटरचा सामना २७ तारखेला होईल.





