R Ashwin Statement : ‘रोहित असो वा हार्दिक, निकाल तोच!’ मुंबई इंडियन्सच्या नव्या निर्णयावर अश्विनचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?
R Ashwin Statement : आयपीएल २०२७ च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा संघाची धुरा रोहित शर्माकडे सोपवली आहे. यानंत माजी क्रिकेटपटू आर अश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे.

R Ashwin Statement on Rohit Sharma’s return as MI captain : आगामी आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडे पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व सोपवून मोठी घोषणा केली आहे. मागील दोन हंगामांत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. यंदा हार्दिक पंजाब किंग्जकडून खेळताना दिसेल, तर अर्शदीप सिंग रोहितच्या नेतृत्वात खेळेल. या घडामोडींवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या आर. अश्विनने आपल्या यूट्यूब वाहिनीवरून मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबईच्या अपयशामागे कर्णधारपद ही समस्या नाही: अश्विन
रोहितच्या पुनरागमनावर भाष्य करताना अश्विन म्हणाला, “मुंबईने याआधी २०२० मध्ये जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यानंतर प्रत्येक हंगामात संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानापर्यंतच राहिला आहे. रोहित कर्णधार असो वा हार्दिक, निकाल जवळपास सारखाच लागला. हार्दिक अपयशी ठरला आणि रोहित असता तर चांगली कामगिरी झाली असती, असे बोलले जाते. पण माझ्या मते कर्णधारपद ही मुळात समस्या नाही, आकडेवारीच सर्व सांगते.”
धोनी-चेन्नईप्रमाणेच रोहित अन् मुंबईचं अतूट नातं –
Ashwin about Rohit Sharma again becoming captain of the Mumbai indians
VC – Ashwin YT
#MumbaiIndians https://t.co/j9kRDd4kEC
— Jaay 💛 (@CricketWithJaay) November 27, 2026
मुंबईने रोहितलाच पुन्हा कर्णधार का निवडलं, यामागचं कारणही अश्विनने स्पष्ट केलं. तो पुढे म्हणाला, “ज्याप्रमाणे एमएस धोनीला चेन्नई सुपर किंग्जपासून वेगळं करता येत नाही, अगदी तसेच रोहित शर्माला मुंबई इंडियन्सपासून वेगळं करता येणार नाही. संघातील प्रत्येक खेळाडू रोहितचा प्रचंड आदर करतो. किरॉन पोलार्ड आणि रोहितमधील नातेसंबंध खूप चांगलं असल्यानेच मुंबईने त्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे.”
बुमराह, अर्शदीप आणि जॅक्सचा रोहित योग्य वापर करेल –
Smile, everybody smile 💙
#MumbaiIndians #CaptainRo https://t.co/YUqYZTQxu9
— Mumbai Indians (@mipaltan) November 27, 2026
रोहितच्या रणनीतिक कौशल्याचे कौतुक करताना अश्विनने मुंबईच्या नव्या आणि मजबूत संघबांधणीचाही आवर्जून उल्लेख केला. तो म्हणाला, “आपल्या खेळाडूंचा आणि गोलंदाजांचा अचूक वापर कसा करायचा, हे रोहितला उत्तम ठाऊक आहे. सध्या मुंबईकडे जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगसारखे भेदक वेगवान गोलंदाज आहेत. याशिवाय फलंदाजीसह गोलंदाजीत मोलाचे योगदान देणारा विल जॅक्स आणि मिचेल सँटनरसारखा अनुभवी खेळाडूही संघात उपलब्ध आहे.”
२०२० नंतर मुंबई इंडियन्सला फायनलची प्रतीक्षा –
रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याच्याच नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्सने सर्वप्रथम आयपीएल जेतेपदाचा मान पटकावला होता. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये तब्बल पाच वेळा विजेतेपदावर मोहर उमटवली होती. मात्र, २०२० नंतर मुंबईचा संघ एकदाही फायनल गाठू शकलेला नाही, त्यामुळे यंदा सर्वांच्या नजरा रोहितवर असतील.





