PM Modi On Gold : “….म्हणून भाव घसरले”; पीएम मोदींनी सांगितलं सोनं-चांदी स्वस्त होण्याचं कारण
PM Modi On Gold : लखनौमधील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने-चांदीच्या दरातील घसरणीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी आयटीआय, कौशल्य विकास आणि रोजगाराबाबतही महत्त्वाचे विधान केले.

PM Modi On Gold : सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले आहे. “गरज नसेल तर एक वर्ष सोने खरेदी करू नका, असे मी देशवासीयांना आवाहन केले होते. देशवासीयांनी सोने खरेदी कमी केली. सोन्याचे दर घसरले. लोक आता सांगत आहेत की, मोदीजी, तुमचे ऐकले आणि आमचे पैसे वाचले.” लखनौ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये आयोजित कौशल दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
मात्र, सोने-चांदीच्या दरातील सध्याच्या घसरणीमागे केवळ भारतीय नागरिकांची कमी झालेली खरेदी या कारणाबरोबरच अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची शक्यता, मजबूत डॉलर आणि सरकारी रोख्यांवरील वाढता परतावा यामुळे जागतिक बाजारात मौल्यवान धातूंची विक्री वाढली आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला आहे.
दरम्यान, 2026 मध्ये सोन्याने गाठलेल्या विक्रमी ₹1,80,779 प्रति 10 ग्रॅम दरावरून 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे ₹55,699 ने घसरला आहे. 21 नोव्हेंबर 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,25,080 प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेटचा दर ₹1,14,650 आहे.
मोदी यांनी यावेळी तरुणांना कौशल्याचे महत्त्वही समजावून सांगितले. केवळ पदवी किंवा कागदी प्रमाणपत्रापेक्षा प्रत्यक्ष काम करण्याचे कौशल्य असलेल्या तरुणांची मागणी वाढणार आहे. जगभरातील कंपन्यांना भारतीय कुशल कामगारांची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी नवीन कौशल्ये शिकण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कुशल कामगारांना जगभर मागणी
मोदी म्हणाले, दुबई आणि अबुधाबी यांसारख्या शहरांच्या उभारणीत भारतीय कारागीर आणि कामगारांचे मोठे योगदान आहे. परदेशातील अनेक कंपन्या भारताकडून दरवर्षी हजारो कुशल मनुष्यबळाची अपेक्षा करत आहेत. विकसित भारत घडवण्यासाठी पुढील २० वर्षांत कौशल्याला अधिक महत्त्व द्यावे लागेल.
एआयमुळे रोजगार जाण्याची भीती नको
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयमुळे रोजगार कमी होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, ज्यांच्याकडे योग्य कौशल्य आहे, त्यांचा रोजगार सहज जाणार नाही, असे मोदी म्हणाले. कोरोना काळात कुशल मनुष्यबळाचे महत्त्व सर्वांना समजले. आज भारतात मुलीही मोबाइल फोन तयार करत आहेत. देशातील उत्पादन क्षेत्र वाढत असून आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
आयटीआयच्या विद्यार्थ्यांनाही आयआयटीइतका सन्मान –
आयटीआयमध्ये प्रवेश घेतल्याचे सांगण्यास काही विद्यार्थ्यांना संकोच वाटतो. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांइतकाच सन्मान आयटीआयच्या विद्यार्थ्यांनाही मिळाला पाहिजे, अशी भूमिका मोदी यांनी मांडली. मोठ्या कंपन्यांच्या कामकाजासाठी पदवीधरांबरोबरच मोठ्या संख्येने कुशल तंत्रज्ञांचीही गरज असते. त्यामुळे कौशल्याधारित शिक्षणाला प्रतिष्ठा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.





