Rahul Gandhi: राहुल गांधींचा एक फोन अन् भाजपचा सगळा प्लॅन फिस्कटला; माजी आमदार भावुक होत म्हणाले “या लढाईत मी तुमच्यासोबत राहीन”
Rahul Gandhi: मुंबईत पक्षप्रवेशाची जय्यत तयारी, पण पक्षप्रवेशाचा निर्णय 2 मिनिटांत रद्द

Rahul Gandhi: बुलढाण्यातील चिखली येथील राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या एका निर्णयाने भाजपचा सगळा प्लॅन फिस्कटल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. राहुल बोंद्रे काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाणार होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बोंद्रे यांचा पक्षप्रवेश होणार होता. या पक्षप्रवेशासाठी मुंबईत जय्यत तयारीही करण्यात आली. परंतु सोमवारी संध्याकाळी घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर राहुल बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. बोंद्रे यांनी ऐनवेळी निर्णय बदलल्याने भाजपाची चांगलीच पंचाईत झाली.
सोमवारी रात्री काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या एका फोननंतर भाजपाचा सगळा प्लॅन फिस्कटला. राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर बोंद्रे यांच्या भूमिकेत मोठा बदल झाला आणि बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राहुल बोंद्रे काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती. त्यात एक दिवस आधीच राहुल बोंद्रे यांनी स्पष्टपणे ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले होते. राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर पक्षातील वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी थेट संपर्क साधला. व्हॉट्सअॅपवर करण्यात आलेल्या या कॉन्फरन्स कॉलवर हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते.
‘पुन्हा हिंमत एकवटून लढेन’
राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी संवाद साधताना म्हंटले की, ‘तुम्ही घाबरू नका, तुमच्यावर दबाव आहे हे आम्हाला ठाऊक आहे. परंतु हरल्याशिवाय विजय मिळत नाही. आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्यावर मानसिक दबाव टाकला जातोय हे सगळे मला माहिती आहे.’ त्यावर राहुल बोंद्रे भावूक होत म्हणाले, ‘भैय्या मी तुमच्याकडे पाहून टिकून होतो. तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची दखल घेऊन फोन केला. मी पुन्हा हिंमत एकवटून लढेन. आता मी सगळं गमावले तरी या लढाईत मी तुमच्यासोबत राहीन,’ असं राहुल बोंद्रे यांनी राहुल गांधींना शब्द दिला.
त्यानंतर आज सकाळीही राहुल बोंद्रे यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यात राहुल गांधी यांच्या लढ्यात सर्वस्व अर्पण करण्याची तयारी, असं या बोंद्रे यांनी म्हटलं आहे.
मुंबईत पक्षप्रवेशाची जय्यत तयारी, पण…
राहुल बोंद्रे भाजपात प्रवेश करणार यासाठी मुंबईत जय्यत तयारी करण्यात आली होती. बोंद्रे यांच्या पक्षप्रवेशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार होते. सोमवारी दिवसभर मुंबईतील पक्ष कार्यालयाबाहेर बॅनर कसे लावायचे, त्याचा प्रोटोकॉल काय याबाबत चर्चा सुरू होती. ४ वाजता त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार होता. मात्र रात्री राहुल गांधी यांच्या फोननंतर हा सर्व प्लॅन फिस्कटला.
राहुल बोंद्रे यांचा राजकीय प्रवास
राहुल बोंद्रे यांची काँग्रेस पक्षाशी त्यांची निष्ठा दीर्घकाळापासून राहिली आहे. सुरुवातीला त्यांनी नगराध्यक्ष म्हणून कार्य केले. राजकारणासोबतच त्यांनी सहकार, शिक्षण, बँकिंग आणि सामाजिक क्षेत्रात २५ वर्षांपेक्षा अधिक काळ मोठे योगदान दिले आहे. ते चिखली विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्षपद देखील सांभाळले आहे.
हेही वाचा:
Satara Earthquake : साताऱ्यात भूकंपाचे सौम्य धक्के; पाच किलोमीटर खोलीवर केंद्र






