Nitesh Karale : ‘या’ कारणामुळे नितेश कराळे मास्तरांची राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी
Nitesh Karale : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी केल्याने नितेश कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

Nitesh Karale : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नितेश कराळे मास्तर यांच्यावर कारवाई केली आहे. पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कराळे यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात कराळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच निवडणुकीत आपल्याला शरद पवारांचा आशीर्वाद असल्याचा संभ्रम निर्माण केल्याचे पक्षाने म्हटले आहे. या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे पक्षाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या स्वाक्षरीचे कारवाईचे पत्र जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, पक्षाचा निर्णय आणि महाविकास आघाडीच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवल्याबद्दल कराळे यांच्यावर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. मतदानाच्या काही तास आधी झालेल्या या कारवाईचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होणार, याकडे लक्ष लागले आहे.






