Anand Paranjpe Join Shiv Sena: राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश; म्हणाले – “12 वर्षांचा वनवास संपत आला”
Anand Paranjpe Join Shiv Sena: “प्रभू श्रीरामांनी १४ वर्षांचा वनवास भोगला. मी १२ वर्षे वनवासात होतो. वनवास चांगलाच असतो आणि तो आता संपत आला आहे,” असे वक्तव्य परांजपे यांनी केले.

Anand Paranjpe Join Shiv Sena: ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते माजी खासदार आनंद परांजपे यांनी अखेर पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, त्या चर्चांना पूर्णविराम देत परांजपे यांनी आज शिवसेनेचा भगवा हाती घेत ‘घरवापसी’ केली.
खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादाभुसे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. गेल्या काही दिवसांत परांजपे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. त्या भेटींनंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना वेग आला होता.
विशेष म्हणजे, २०१२ मध्ये शिवसेनेला रामराम करताना परांजपे यांनी एकनाथ शिंदे यांची नाराजी ओढवून घेतल्याची चर्चा होती. मात्र, अलीकडील भेटींमधून दोघांतील दुरावा कमी झाल्याचे मानले जात होते, शिंदे यांनीच त्यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता –
दरम्यान, शिवसेनेत परतल्यानंतर परांजपे यांना कोणती जबाबदारी दिली जाणार, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यांना एखाद्या महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. “मी कोणत्याही अपेक्षेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले नाही. पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या. त्यामुळे पक्षातील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो,” असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफकडी राजीनामा
तसेच, “मी स्वगृही परतलो आहे. माझा डीएनए शिवसेनेचाच आहे. कुठल्याही पदाच्या अपेक्षेने मी शिवसेनेत आलो नाही. पक्ष संघटनेत कार्यकर्ता म्हणून काम करणार असून, पक्ष जे काम देईल ते पूर्ण ताकदीने पार पाडेन,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी प्रभू श्रीरामांच्या वनवासाचा उल्लेख करत भावनिक भाष्य केले. “प्रभू श्रीरामांनी १४ वर्षांचा वनवास भोगला. मी १२ वर्षे वनवासात होतो. वनवास चांगलाच असतो आणि तो आता संपत आला आहे,” असे वक्तव्य परांजपे यांनी केले.




