Supriya Sule : आधी जावई-व्याहींसह घेतली मोदींची भेट; नंतर काही तासात केंद्र सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule : सुळे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन कन्या रेवती सुळे हिच्या विवाहाचे आमंत्रण दिले होते.

Supriya Sule : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच सहकुटुंब भेट घेतल्यानंतर आता इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात संघर्षमय आणि अडचणीचा काळ सुरू असून सामान्य नागरिक, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विवाहाचे आमंत्रण दिले – (Supriya Sule )
सुळे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन कन्या रेवती सुळे हिच्या विवाहाचे आमंत्रण दिले होते. यावेळी त्यांच्यासमवेत व्याही अरुण लखानी आणि जावई सारंग लखानी उपस्थित होते. या भेटीनंतर मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी इंधन दरवाढ, युरिया टंचाई आणि केंद्र सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडल्याचे सांगत सुळे म्हणाल्या, “आम्ही सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवत आहोत. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीने संसदेतही हा मुद्दा लावून धरला होता. मात्र सरकार गंभीरतेने दखल घेताना दिसत नाही.”
लाईव्ह |📍मुंबई ⏭️ 25-05-2026 पत्रकारांशी संवाद https://t.co/omXjPkQrRw
— Supriya Sule (@supriya_sule) May 25, 2026
सरकारचे नेमके नियोजन काय? (Supriya Sule )
“पेट्रोल-डिझेलसाठी सामान्य माणूस रांगेत उभा आहे. शेतकऱ्यांनाही मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. मंत्रीच युरिया उपलब्ध होणार नसल्याचे सांगत असतील तर प्रश्न सुटणार कसे?” असा सवाल त्यांनी केला. “कशाचंही सोंग घेता येतं; पण पैसे आणि अन्नधान्याचं सोंग घेता येत नाही,” असे म्हणत त्यांनी देशासमोर राष्ट्रीय संकट उभे राहिल्याचा इशाराही दिला. (Supriya Sule)
राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या वक्तव्यांमध्ये विसंगती असल्याचाही आरोप त्यांनी केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की देशात पुरेसा साठा आहे; तर मंत्री छगन भुजबळ ३० दिवसांचाच साठा असल्याचे सांगतात. मग सरकारचे नेमके नियोजन काय आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या बैठकीबाबत विचारले असता, विधान परिषद निवडणुका महत्त्वाच्या असल्या तरी देशासमोरील आर्थिक आणि सामाजिक आव्हानांवर महाविकास आघाडी गांभीर्याने चर्चा करणार असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. “निवडणुका येतील आणि जातील; पण कर भरणाऱ्या सामान्य माणसाने जगायचे कसे, हा खरा प्रश्न आहे,” असेही त्या म्हणाल्या.





