NEET paper leak: ‘तुम्ही शिक्षणमंत्र्यांना बडतर्फ का करत नाही?’ ; नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पंतप्रधानांना सवाल
NEET paper leak: नीट (यूजी २०२६) पेपरफुटी आणि सीबीआय चौकशीच्या पार्श्वभूमीवर, या संपूर्ण प्रकरणाने आता एक मोठे राजकीय वळण घेतले आहे.

NEET paper leak: नीट (यूजी २०२६) पेपरफुटी आणि सीबीआय चौकशीच्या पार्श्वभूमीवर, या संपूर्ण प्रकरणाने आता एक मोठे राजकीय वळण घेतले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या मोठ्या घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर आतापर्यंतचा सर्वात जहाल हल्ला चढवला आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून, २२ लाख मुलांच्या भविष्याशी केलेल्या या विश्वासघाताबद्दल पंतप्रधानांकडून थेट उत्तराची मागणी केली आहे.
२०२४ आणि २०२६ च्या नीट पेपरफुटीची तुलना करत, राहुल गांधी यांनी व्यवस्थेवर टीका केली आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी #SackPradhan मोहीम सुरू केली.
२२ लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया गेली.
राहुल गांधी इथेच थांबले नाहीत. व्हिडिओमध्ये त्यांनी भावूक होऊन सांगितले की, देशभरातील २२ लाख विद्यार्थ्यांनी दोन वर्षे रात्रंदिवस या परीक्षेची तयारी केली होती, पण त्यांची मेहनत रातोरात वाया गेली. त्यांनी असा आरोप केला की, परीक्षेच्या अवघ्या दोन दिवस आधी व्हॉट्सॲपवर पेपर वितरित करण्यात आला.
शिक्षणमंत्र्यांवर हल्लाबोल करताना राहुल म्हणाले की, “देशाचे शिक्षणमंत्री दावा करतात की पेपरफुटीशी त्यांचा काहीही संबंध नाही. संसदीय समितीने काही शिफारसी केल्या होत्या, पण केवळ विरोधी पक्षाचे खासदार सामील असल्यामुळे त्या कचरापेटीत टाकण्यात आल्या.”
NEET के 22 लाख बच्चों के साथ धोखा हुआ है। पर मोदी जी एक शब्द भी नहीं बोल रहे।
धर्मेंद्र प्रधान जी को अभी हटाइए, या जवाबदेही ख़ुद लीजिए।
Modi ji, SACK Dharmendra Pradhan ji NOW. pic.twitter.com/6FRMMa8AI8
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2026
जे संसदेवर विश्वास ठेवत नाहीत ते नीट (NEET) मध्ये सुधारणा कशी करू शकतात? त्यांनी असा आरोप केला की, विद्यापीठांमध्ये कोणत्याही गुणवत्तेशिवाय केवळ एका विशिष्ट विचारसरणीच्या (आरएसएस-भाजप) लोकांना कुलगुरू आणि प्राध्यापक म्हणून नियुक्त केले जात आहे, ज्यामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे आणि देशात आतापर्यंत ८० हून अधिक वेळा पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत.
सरकार दबावाखाली, परीक्षा २१ जूनला
राहुल गांधींच्या हल्ल्यानंतर आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर सरकार पूर्णपणे बॅकफूटवर आले आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एनटीएने २१ जून २०२६ रोजी परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि शिक्षणमंत्र्यांनी पुढील वर्षापासून परीक्षा ऑनलाइन (संगणक-आधारित) घेण्याचे आश्वासन दिले आहे.
मात्र, विरोधी पक्ष आता केवळ आश्वासने स्वीकारण्यास तयार नाही. राहुल गांधी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकतर धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून दूर करावे किंवा पेपरफुटीची जबाबदारी घ्यावी.





