Mohammad Kaif Statement : “बाहेर बसून तो पुनरागमन कसे करणार?” मोहम्मद सिराजवरील अन्यायाविरोधात मोहम्मद कैफ संतापला
Mohammad Kaif Statement : मोहम्मद कैफने मोहम्मद सिराजला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Mohammad Kaif Statement on team management for repeatedly overlooking Siraj : माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफने मोहम्मद सिराजला सलग सामन्यांतून डावलल्याबद्दल भारतीय संघ व्यवस्थापनावर जोरदार निशाणा साधला आहे. दुखापतग्रस्त आकाश दीपच्या जागी प्रसिध कृष्णाला कन्कशन सब्स्टिट्यूट बनवल्यावरही त्याने सवाल केला. कैफने लिहिले, “सिराजवर अन्याय होत असल्याचे सर्वजण म्हणत आहेत आणि ते स्पष्ट दिसत आहे. चालू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज असूनही त्याला संधी मिळत नाही.”
व्यवस्थापनाच्या निर्णयातील विरोधाभासावर कैफचे बोट –
संघ व्यवस्थापनाच्या भूमिकेतील विरोधाभासाकडे लक्ष वेधताना कैफने विचारले की, प्रसिध कृष्णा सिराजपेक्षा चांगला पर्याय होता, तर त्याला दुसऱ्या कसोटीतून वगळलेच का? शुबमन गिलने सिराजचा वेग काहीसा कमी झाल्याचे सांगत दमदार पुनरागमनाची अपेक्षा व्यक्त केली होती. यावर व्हिडिओत कैफ म्हणाला, “एखादा खेळाडू दमदार पुनरागमन कधी करेल? जेव्हा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल तेव्हाच; बाहेर बसून तो पुनरागमन कसे करणार?”
४८ कसोटींचा अनुभव असूनही सिराजला ठेवले बाहेर –
Siraj is a proven match-winner. https://t.co/djYBZaZAud
— Mohammad Kaif (@MohammadKaif) November 29, 2026
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, आकाश दीप आणि युवा अंशुल कंबोज या चार वेगवान गोलंदाजांना संधी दिली होती. या सामन्यापूर्वी कंबोजकडे केवळ एका कसोटीचा अनुभव होता, तर तब्बल ४८ कसोटी सामने खेळलेल्या सिराजला मात्र बाहेर बसावे लागले. दिग्गज सुनील गावस्कर आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही सिराजला न खेळवण्याच्या निर्णयावर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
मेलबर्नमध्ये एकत्र पदार्पण अन् गिल-सिराजची घट्ट मैत्री
Mohammad Kaif questioned India’s decision to draw. https://t.co/yIZSuLobyU
— RVCJ Media (@RVCJ_FB) November 26, 2026
कर्णधार शुबमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी डिसेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत एकत्र पदार्पण केले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये अत्यंत घट्ट मैत्री आहे. मात्र, वेलिंग्टन येथील न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत गिलने मैत्रीपेक्षा चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना संधी देणे उचित मानले आणि या कठीण निर्णयामागील आपली भूमिकाही स्पष्टपणे मांडली होती.
सिराजला बाहेर ठेवण्याचा निर्णय अत्यंत कठीण: गिल
याबाबत भारतीय कर्णधार म्हणाला होता, “सिराज उत्तम खेळाडू व शानदार गोलंदाज असून त्याने भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याहीपेक्षा तो माझा चांगला मित्र आहे. आम्ही एकत्र पदार्पण केले आणि त्यापूर्वीपासूनच घट्ट मित्र आहोत. त्यामुळे त्याला बाहेर ठेवणे माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता; पण कधीकधी कोणते गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि सर्वोत्तम मारा करत आहेत, हे पाहावे लागते.”





