MI vs RR : राजस्थानने मुंबईला धूळ चारत पटकावलं प्लेऑफचं तिकीट! जोफ्रा आर्चर ठरला गेमचेंजर, पंजाब-केकेआरचं स्वप्न भंगलं
MI vs RR : राजस्थान रॉयल्स प्ले-ऑफमध्ये पोहोचणारा चौथा आणि शेवटचा संघ ठरला आहे. राजस्थानच्या या विजयामुळे पंजाब किंग्स आणि केकेआर हे संघ अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडले

MI vs RR Rajasthan Royals Qualify Playoffs : आयपीएल २०२६ मधील प्ले-ऑफचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ३० धावांनी पराभव करत बाद फेरीत धडक मारली आहे. या दणदणीत विजयासह राजस्थान रॉयल्स प्ले-ऑफमध्ये पोहोचणारा चौथा आणि शेवटचा संघ ठरला आहे. राजस्थानच्या या विजयामुळे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) हे संघ अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
१४ सामन्यानंतर राजस्थानचे एकूण १६ गुण झाले आहेत. दुसरीकडे, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ १४ सामन्यांत केवळ ८ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहून या हंगामाचा निरोप घेतला.
जोफ्रा आर्चर ठरला गेमचेंजर –
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रियान परागच्या राजस्थान रॉयल्स संघाने २० षटकांत ८ बाद २०५ धावांचा महाकाय डोंगर उभा केला. यशस्वी जैस्वालने १७ चेंडूंत २७ धावा करत वेगवान सुरुवात केली, पण तो लवकर बाद झाला. वैभव सूर्यवंशी (४) आणि स्वतः कर्णधार रियान पराग (१४) अपयशी ठरल्याने पॉवरप्लेमध्येच राजस्थानची अवस्था ३ बाद ५४ अशी झाली होती.
With the bat 🔥
With the ball 🔥🔥Jofra Archer coming in clutch for #RR 🩷
Updates ▶️ https://t.co/h2ze7K0gd6#TATAIPL | #KhelBindaas | #MIvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/En2h01xvdC
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2026
अशा कठीण प्रसंगात ध्रुव जुरेल (२६ चेंडूंत ३८ धावा), दासुन शनाका (१५ चेंडूंत २९ धावा) आणि जोफ्रा आर्चर (१५ चेंडूंत ३२ धावा) यांनी छोट्या पण अत्यंत स्फोटक खेळी खेळून संघाला दोनशे पार पोहोचवले. डावाच्या शेवटी रवींद्र जडेजाने १९ आणि नांद्रे बर्गरने १० धावा करत नाबाद राहिले. मुंबईकडून शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.
पॉवरप्लेमध्येच मुंबईचा डाव पत्त्यासारखा कोसळला
प्रत्युत्तरात २०६ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्याच षटकात रोहित शर्मा शून्यावर जोफ्रा आर्चरचा शिकार बनला. पाठोपाठ नमन धीर, रेयान रिकेल्टन आणि तिलक वर्मा पॉवरप्लेमध्येच बाद झाल्याने मुंबईची अवस्था ४ बाद अशी बिकट झाली होती.यानंतर सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स (३३) यांनी ६३ धावांची भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला.
A 𝙍𝙤𝙮𝙖𝙡 𝙀𝙣𝙩𝙧𝙮 into the Playoffs ✅
Make way for the @rajasthanroyals 🩷#TATAIPL | #KhelBindaas | #MIvRR pic.twitter.com/egtoP5bh7e
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2026
हार्दिक पांड्याने मैदानात येताच १५ चेंडूंत ३४ धावा कुटत आक्रमक खेळ केला, तर दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवने ६० धावांची उत्कृष्ट खेळी केली. १५ षटकांत मुंबईने ५ बाद १४७ धावा केल्या होत्या, मात्र १६ व्या षटकात आर्चरने अवघ्या ३ धावा देत हार्दिकला बाद केले. त्यानंतर १८ व्या षटकात सूर्यकुमार बाद होताच मुंबईचा पराभव निश्चित झाला. मुंबईचा डाव २० षटकांत ९ बाद १७५ धावांवरच मर्यादित राहिला.
आता बाद फेरीचे चित्र स्पष्ट; कोणाची कोणाशी होणार लढत?
गुणतालिकेतील अव्वल स्थानांमुळे ‘क्वालिफायर-१’ चा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाईल. तर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहिलेला राजस्थान रॉयल्सचा संघ आता ‘एलिमिनेटर’ (Eliminator) सामन्यात सनरायझर्स हैदराबादशी (SRH) भिडणार आहे.
लहान पण महत्त्वपूर्ण खेळीने राजस्थानला नेले २०० पार!





