Rohit Sharma Fitness : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी हिटमॅन नक्की किती फिट? इम्पॅक्ट प्लेयर बनवण्यामागचं खरं कारण आलं समोर
Rohit Sharma Fitness : फिटनेसच्या आधारावर रोहित शर्माची अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली आहे. मालिकेत खेळण्यापूर्वी त्याला फिटनेस चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.

Rohit Sharma Fitness Update : पुढील महिन्यात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने नुकतीच टीम इंडियाची घोषणा केली आहे. या संघात कर्णधार रोहित शर्माची निवड करण्यात आली असली, तरी ती त्याच्या ‘फिटनेस’च्या अटीवर आधारित आहे. म्हणजेच संघात खेळण्यासाठी रोहितला आधी मुख्य फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे. या सर्व संशयाच्या वातावरणात आता मुंबई इंडियन्सचे हेड कोच महेला जयवर्धने यांनी रोहितच्या फिटनेसवर एक मोठी आणि दिलासादायक अपडेट दिली आहे.
हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे ३ आठवडे मैदानाबाहेर –
आयपीएल २०२६ दरम्यान रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगच्या गंभीर दुखापतीचा सामना करावा केला होता. यामुळे तो सुमारे तीन आठवडे मैदानापासून दूर राहिला आणि मुंबई इंडियन्सच्या अनेक महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग बनू शकला नव्हता. त्याच्या याच दुखापतीमुळे निवडकर्त्यांनी आणि संघ व्यवस्थापनाने खबरदारी म्हणून त्याचा अफगाणिस्तान मालिकेतील सहभाग फिटनेस चाचणीच्या अधीन ठेवला आहे.
महेला जयवर्धनेने दिली गुड न्यूज!
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई इंडियन्सचे हेड कोच महेला जयवर्धने यांनी रोहित शर्माच्या फिटनेसबाबत सकारात्मक माहिती दिली. जयवर्धने म्हणाले, “संघाच्या मेडिकल रिपोर्टनुसार, रोहित आता पूर्णपणे फिट आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास नाही. दुखापतीतून पुनरागमन करताना सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आम्ही सावधगिरी बाळगली होती, पण आता रोहित पूर्ण क्षमतेने खेळण्यासाठी सज्ज आहे.”
Mahela Jayawardne on Rohit Sharma’s Fitness:
” According to me, according to our medical team, Rohit is 100% Fit. After coming back from the hamstring injury, first game we were a bit cautious. Now is playing as an Impact Sub just for the team combination (when we are bowling).… pic.twitter.com/E3alVlVTgC
— Rohit Sharma Fan (@hitmanfanfollow) May 23, 2026
तसेच, गेल्या काही सामन्यांमध्ये रोहितला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून वापरण्याचा निर्णय केवळ संघाच्या रणनीतीचा भाग होता, त्याचा रोहितच्या फिटनेसशी कोणताही संबंध नाही, असेही जयवर्धनेने स्पष्ट केले.
आयपीएल २०२६ मधील कामगिरी –
रोहितने या हंगामात दुखापतीमुळे केवळ ८ सामने खेळले आहेत, परंतु त्यात त्याने ४०.४२ च्या सरासरीने आणि १६०.७९ च्या वादळी स्ट्राईक रेटने २८३ धावा कुटल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सचा संघ या हंगामात १३ पैकी केवळ ४ सामने जिंकून प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला, तरी रोहितचे पूर्णपणे तंदुरुस्त होणे आगामी आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघासाठी जमेची बाजू आहे.





