Matheesha Pathirana Injury : १८ कोटींचा गोलंदाज अन् फक्त ८ चेंडू टाकून बाहेर! केकेआरला लागला IPL च्या इतिहासात सर्वात मोठा चुना
Matheesha Pathirana Injury : केकेआरचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातून अधिकृतपणे बाहेर पडला आहे.

KKR Matheesha Pathirana Injury IPL 2026 : आयपीएल २०२६ चा लीग टप्पा संपण्यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. अंगकृष रघुवंशीपाठोपाठ आता केकेआरचा सर्वात महागडा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातून अधिकृतपणे बाहेर पडला आहे. पथिरानाच्या जागी केकेआरने बदली खेळाडू म्हणून एका जुन्या शिलेदाराला संघात सामील केले आहे. मात्र, पथिरानाच्या या दुखापतीमुळे कोलकाता फ्रेंचायझीचे कोट्यवधी रुपयांचे अतोनात नुकसान झाले असून त्याची आकडेवारी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
१ चेंडू पडला ₹२.२५ कोटींना; फ्रेंचायझीला बसला मोठा फटका!
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या आयपीएल लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने मथीशा पथिरानाला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी तब्बल १८ कोटी रुपयांची अवाढव्य रक्कम मोजली होती. पथिराना सुरुवातीला दुखापतीमुळे पहिल्या टप्प्यातील सामन्यांना मुकला होता. त्यानंतर १६ मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात तो फिट होऊन मैदानात उतरला.
😂😂 KKR’s Biggest Fraud of IPL 2026 🔥
Matheesha Pathirana
The ₹18 CRORE player– Missed first 13 matches due to injury
– Finally debuted against GT
– Bowled just 8 balls
– Then pulled his hamstring and walked off the field 😭Total contribution: ZERO
Cost per… pic.twitter.com/XJziycKswv— shribhaskarkalita (@crinewsindia) May 24, 2026
परंतु, या सामन्यात अवघे ८ चेंडू टाकल्यानंतर त्याच्या हॅमस्ट्रिंगची दुखापत पुन्हा उफाळून आली आणि त्याला मैदान सोडून जावे लागले. आता तो संपूर्ण आयपीएल हंगामामधून बाहेर झाला आहे. १८ कोटींच्या या खेळाडूने यंदाच्या हंगामात फक्त ८ चेंडू टाकले, म्हणजेच गणितानुसार केकेआरला त्याच्या एका चेंडूची किंमत तब्बल २ कोटी २५ लाख रुपये एवढी पडली आहे.
लवनीथ सिसोदियाची केकेआरच्या ताफ्यात एन्ट्री!
मथीशा पथिराना बाहेर पडल्यानंतर केकेआर अधिकृत पत्रक जारी करून त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. केकेआरने कर्नाटकच्या लवनीथ सिसोदिया या यष्टीरक्षक फलंदाजाला ३० लाख रुपयांच्या बेस प्राईजवर संघात समाविष्ट केले आहे. लवनीथ यापूर्वीही केकेआर आणि आरसीबी संघाचा भाग राहिला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये १५ टी-२० सामन्यांत १२४ धावा केल्या आहेत. लीग स्टेजच्या निर्णायक सामन्यापूर्वी पथिरानासारखा मुख्य गोलंदाज बाहेर होणे केकेआरसाठी रणनीतिकदृष्ट्या मोठा फटका मानला जात आहे.





