Kolkata fire: प्रजासत्ताक दिनी गोदामाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Kolkata fire: या दुर्घटनेत तीन गोदामे पूर्णपणे खाक झाली असून अद्याप २० जण बेपत्ता असल्याचे समजते.

Kolkata fire: देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच, कोलकाताच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील नजीराबाद (आनंदपूर परिसर) येथील एका गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत तीन गोदामे पूर्णपणे खाक झाली असून अद्याप २० जण बेपत्ता असल्याचे समजते.
पहाटे ३ वाजता काळ बनून आली आग –
मिळालेल्या माहितीनुसार, नजीराबाद येथील सुका मेवा, खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या बाटल्या साठवून ठेवलेल्या गोदामाला सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास अचानक आग लागली. गोदामात ज्वालाग्राही पदार्थांचा साठा असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि शेजारील अन्य दोन गोदामांनाही आपल्या विळख्यात घेतले.
बाहेरून कुलूप असल्याने कामगारांचा कोंडमारा –
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. आग लागली तेव्हा गोदामाला बाहेरून कुलूप लावलेले होते, त्यामुळे आतमध्ये कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक आणि कामगारांना बाहेर पडता आले नाही.
रात्रपाळीला असलेले कर्मचारी आतच अडकून पडल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. चिंचोळ्या गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास आणि पाण्याचा पुरवठा करण्यास सुरुवातीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
#WATCH | West Bengal: Fire breaks out in a residential apartment in Mandir Gali in Kolkata’s Mullick Bazar. Fire tenders have reached the spot. pic.twitter.com/gmCd000Xtc
— ANI (@ANI) January 26, 2026
Kolkata fire
१५ बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण-
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. गॅस कटरच्या साहाय्याने भिंती आणि दरवाजे तोडून जवान आत शिरले. सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सायंकाळपर्यंत काही ठिकाणी धुमसणारी आग विझवण्यासाठी ‘कुलिंग ऑपरेशन’ राबवले जात आहे.
राजकारण करण्याची ही वेळ नाही : अरुप बिस्वास
राज्याचे ऊर्जा मंत्री अरुप बिस्वास यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी युद्धपातळीवर काम करत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता हे राजकारण करण्याची वेळ नसून, बचावकार्याला प्राधान्य देण्याची गरज आहे.” त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले असून बेपत्ता असलेल्या २० जणांचा शोध घेण्याचे आश्वासन दिले आहे.
या भीषण आगीमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, गोदामांच्या सुरक्षेचा आणि अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





