Kolhapur : भिंत कोसळून प्राध्यापिकेसह विद्यार्थिनीचा अंत
Kolhapur : ४५ वर्षीय प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार आणि सहावीत शिकणारी १४ वर्षीय विद्यार्थिनी वैष्णवी तुकाराम भोसले यांच्या अंगावर अचानक भिंतीचा मोठा भाग आणि मातीचा ढिगारा कोसळला.

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यासाठी आजचा दिवस दुर्दैवी ठरला आहे. आजरा शहरात जुन्या घराचे पाडकाम सुरू असताना भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह १४ वर्षीय शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. आजरा येथील ‘वाणी गल्ली’ परिसरात सोमवारी ही हृदयद्रावक दुर्घटना घडली.
येथील डॉ. देशपांडे यांच्या मालकीच्या जुन्या घराची दक्षिणेकडील आणि रस्त्यालगतची भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असतानाच रस्त्यावरून जाणाऱ्या ४५ वर्षीय प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार आणि सहावीत शिकणारी १४ वर्षीय विद्यार्थिनी वैष्णवी तुकाराम भोसले यांच्या अंगावर अचानक भिंतीचा मोठा भाग आणि मातीचा ढिगारा कोसळला.
या भीषण ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याने दोघींचाही जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ललिता भोसले नावाची महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरवस्तीत पाडकाम सुरू असताना सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले नसल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत असून, या घटनेमुळे संपूर्ण आजरा शहरावर शोककळा पसरली आहे.





