Jayant Patil : जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मागणी
Jayant Patil : केंद्र सरकारशी समन्वय साधून दीर्घकालीन आणि स्थिर निर्यात धोरण राबवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.

Jayant Patil : शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. कांद्याला किमान 2000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करण्यात यावा तसेच सध्याच्या आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
जयंत पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य असून नाशिक, पुणे, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांचे अर्थकारण कांदा पिकावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. (Jayant Patil )
बियाणे, खते, औषधे आणि मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असताना बाजारात मिळणारा भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून बाजार समित्यांमधील दर स्थिर करण्यासाठी नाफेड आणि इतर संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Jayant Patil)
याशिवाय कांदा निर्यातीबाबत सातत्याने बदलणाऱ्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची विश्वासार्हता कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारशी समन्वय साधून दीर्घकालीन आणि स्थिर निर्यात धोरण राबवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे.
शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 500 ते 700 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावं, तसेच रासायनिक खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Jayant Patil)
भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागात आधुनिक शीतगृहे आणि ‘कांदा चाळ’ उभारणीसाठी भरघोस अनुदान देण्यासोबतच दर्जेदार कांदा बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात यावीत, असेही जयंत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांनी केलेले या मागणीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा : Alia Bhatt: कान्समध्ये आलिया भट्टचा रॉयल जलवा! विंटेज कॉर्सेट साडी गाऊनने वेधलं सगळ्यांचं लक्ष






