Shirdi: पुढील 25-30 वर्षांत भारत जगातील सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार देश बनेल : राजनाथ सिंह
Shirdi: भारताचा जागतिक शस्त्र निर्यातीतील हिस्सा सध्या केवळ ०.२ टक्के असून, भारत अजूनही जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश असल्याचे SIPRI च्या आकडेवारीतून समोर आले आहे.

Shirdi: एकेकाळी शस्त्रास्त्र आयातीवर अवलंबून असलेला भारत पुढील 25 ते 30 वर्षांत जगातील सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार देश बनेल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी व्यक्त केला.
शिर्डी येथे दारुगोळा निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी प्रमुख संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
“जो देश स्वतःची शस्त्रे तयार करतो, तोच स्वतःचे भविष्य लिहितो,” असे सांगत सिंह यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रात खासगी उद्योगांची भूमिका झपाट्याने वाढत असल्याचे नमूद केले. काही वर्षांपूर्वी संरक्षण उत्पादनात खासगी क्षेत्राचा सहभाग अत्यल्प होता; मात्र आता तो 25 ते 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून तो 50 टक्क्यांपर्यंत नेण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मॉडेल’ लागू –
“खासगी उद्योग केवळ नट-बोल्ट पुरवणारे राहिलेले नाहीत, तर अत्याधुनिक शस्त्र प्रणाली तयार करणारे भागीदार बनले आहेत,” असेही सिंह म्हणाले. सरकारची दूरदृष्टी आणि खासगी क्षेत्रातील नवकल्पना यांचा संगम झाल्यास देश नव्या उंचीवर पोहोचू शकतो, असे ते म्हणाले.
VIDEO | Shirdi: Addressing inauguration ceremony of Missile Complex & Artillery Shell Production Line, Defence Minister Rajnath Singh (@rajnathsingh) says, “There is no shortage of talent in India, and there is no shortage of courageous people either. They just need… pic.twitter.com/mjNLt5wThB
— Press Trust of India (@PTI_News) May 23, 2026
भारताला दारुगोळा आणि संरक्षण उत्पादनाचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक सुधारणा, थेट परकीय गुंतवणुकीतील सवलती तसेच ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मॉडेल’ लागू केल्याची माहिती त्यांनी दिली.
सशस्त्र दलांनी देशातच खरेदी कराव्यात अशा सुमारे 5 हजार संरक्षण साहित्यांच्या ‘पॉझिटिव्ह इंडिजेनायझेशन’ यादीची अंमलबजावणी करण्यात आल्याचेही सिंह यांनी सांगितले. युवा संशोधक आणि नवउद्योजकांना संरक्षण क्षेत्रात प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा – ‘मोदी-ट्रम्प दूरदृष्टी असलेले नेते’; भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत होणार : मार्को रुबियो
200 एकर जागेवर प्रकल्प –
दरम्यान, शिर्डीतील हा प्रकल्प सुमारे 200 एकर जागेवर उभारण्यात आला असून येथे तोफगोळे आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी लागणारे साहित्य तयार केले जाणार आहे. या प्रकल्पातून थेट व अप्रत्यक्षरीत्या सुमारे दोन हजार रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती ‘नाइब ग्रुप’चे अध्यक्ष गणेश नाइब यांनी दिली.
कार्यक्रमानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साईबाबा मंदिरात दर्शन घेतले.
कोणता देश किती शस्त्र निर्यात करतो –
दरम्यान, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार सध्या जगातील सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार देश अमेरिका असून जागतिक शस्त्र निर्यातीतील त्याचा वाटा ४२ टक्के आहे. त्यापाठोपाठ फ्रान्स चा १० टक्के वाटा आहे.
रशियाचा जागतिक शस्त्र निर्यातीतील वाटा ७ टक्के असून जर्मनी आणि चीन यांचा प्रत्येकी ६ टक्के वाटा आहे. इटलीचा ५ टक्के, तर इस्त्रायल चा ४ टक्के वाटा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारताचा जागतिक शस्त्र निर्यातीतील हिस्सा सध्या केवळ ०.२ टक्के असून, भारत अजूनही जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश असल्याचे SIPRI च्या आकडेवारीतून समोर आले आहे.





