Top 10 News : महाराष्ट्रासह 20 राज्यांत मुसळधार, अॅमेझॉनची धमाकेदार ऑफर! ते 7 कामगारांचा मृत्यू…; वाचा आजच्या टॉप १० बातम्या
Top 10 News : Top 10 News : महाराष्ट्रासह 20 राज्यांत मुसळधार ते 7 कामगारांचा मृत्यू...; वाचा आजच्या टॉप १० बातम्या

Top 10 News : १) महाराष्ट्रासह 20 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढचे 15 तास महत्त्वाचे
भारतीय हवामान विभागाने देशातील 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी पुढील 15 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला आहे. अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 80 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहू शकते. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, विजांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Top 10 News)
२) उद्यापासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून, त्याआधीच महाविकास आघाडीने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधकांनी सरकारच्या पारंपरिक चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत शेतकरी, दुष्काळ, कर्जमाफी, लाडकी बहीण योजना आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा इशारा दिला. पत्रकार परिषदेत शिवसेना (ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी अल निनोच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, 2 लाखांच्या कर्जमाफीतील अटी, 81 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळल्याचा मुद्दा आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही विरोधकांनी केली. त्यामुळे अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. (Top 10 News)
३) नागेश पाटील आष्टीकरांनी सांगितलं शिवसेना सोडण्यामागचं कारण
ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या खासदारांपैकी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रथमच फेसबुक लाईव्हद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलीय. “मी दुसरीकडे कुठेही गेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो आहे,” असे सांगत त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय योग्य असल्याचा दावा केला. सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामे रखडत होती, त्यामुळे लोकांची कामे करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. शिवसेना वर्धापन दिनाच्या मेळाव्यात झालेल्या टीकेमुळे मन दुखावल्याचाही उल्लेख त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असंवैधानिक भाषा वापरू नये आणि आपला राग मर्यादेत व्यक्त करावा, असे आवाहनही त्यांनी केले. विचारधारा बदललेली नसून जनतेची सेवा करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. (Top 10 News)
४) ‘आम्ही काय आतंकवादी आहोत का?’; आंदोलनाला परवानगी नाकारल्याने अभिजित दीपके आक्रमक
कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सरकारवर निशाणा साधला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असून, पोलिसांकडून परवानगी दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. “आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडत आहोत, आम्ही काय आतंकवादी आहोत का?” असा संतप्त सवाल दीपके यांनी उपस्थित केला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, मुंबईतील परळ येथील एका NEET परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थी काही मिनिटे उशिरा पोहोचल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. पालकांनी विनंती करूनही NTA अधिकाऱ्यांनी नियमांचा हवाला देत परीक्षेला बसण्यास परवानगी दिली नाही.
५) वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आषाढी यात्रेसाठी ५,५०० एसटी बसेस
आषाढी एकादशी यात्रेनिमित्त वारकरी आणि विठ्ठल भक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळाने मोठी सुविधा जाहीर केली आहे. यंदा 5,500 विशेष एसटी बसगाड्या पंढरपूरसाठी चालवण्यात येणार आहेत. गावातील किमान 40 प्रवाशांनी मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत एसटी सेवा उपलब्ध होणार आहे. यंदाची आषाढी एकादशी 26 जुलै रोजी असून भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बससंख्येत 300 ने वाढ करण्यात आली आहे. पंढरपुरात चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि आयटीआय महाविद्यालय येथे चार तात्पुरती बस स्थानके उभारली जाणार आहेत. पिण्याचे पाणी, शौचालय, आरक्षण केंद्र आणि चौकशी कक्षासह आवश्यक सुविधा उपलब्ध असतील. सर्व प्रवासी सवलतीही लागू राहणार असून भाविकांनी जवळच्या एसटी आगारात विशेष बसची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
६) तामिळनाडूत अमोनिया वायू गळतीने 7 कामगारांचा मृत्यू
तामिळनाडूतील तिरुवल्लूर येथील एका कारखान्यात अमोनिया वायूची गळती होऊन भीषण दुर्घटना घडली. या घटनेत 7 कामगारांचा मृत्यू झाला, तर 70 हून अधिक कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली आहे. दुर्घटनेच्या वेळी कारखान्यात 100 हून अधिक कर्मचारी काम करत होते. वायूची गळती होताच अनेकांनी जीव वाचवण्यासाठी कारखान्याबाहेर धाव घेतली. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे. हा कारखाना कोळंबी प्रक्रिया उद्योगाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर मुख्यमंत्री विजय यांनी शोक व्यक्त करत चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमली असून 24 तासांत अंतरिम आणि तीन दिवसांत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
७) इंग्लंडमध्ये पुन्हा राजकीय भूकंप? पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या राजीनाम्याची चर्चा
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या संभाव्य राजीनाम्याच्या चर्चेमुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ‘द ऑब्झर्व्हर’च्या वृत्तानुसार, स्टारमर सोमवारी राजीनाम्याची घोषणा करू शकतात. मात्र, रॉयटर्सने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने हा दावा फेटाळून लावत स्टारमर अद्याप पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, लेबर पक्षातील 100 हून अधिक खासदारांनी स्टारमर यांनी राजीनामा द्यावा किंवा त्याची मुदत जाहीर करावी, अशी उघड मागणी केली आहे. हे खासदार पक्षाच्या एकूण संसदीय संख्येच्या जवळपास एक चतुर्थांश आहेत. स्टारमर यांनी पद सोडल्यास गेल्या दहा वर्षांत कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणारे ते ब्रिटनचे सहावे पंतप्रधान ठरतील.
८) अॅमेझॉनची धमाकेदार ऑफर! आयफोनवर मिळतंय तगडं डिस्काऊंट, क्रेडिट कार्डधारकांसाठी एक्स्ट्रा बेनिफीट
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर आयफोन एअर मोठ्या सवलतीत उपलब्ध झाला आहे. 1,19,900 रुपयांच्या लॉन्च किमतीचा हा स्मार्टफोन सध्या 96,990 रुपयांत विक्रीसाठी असून ग्राहकांना 22,910 रुपयांचा थेट डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय, एसबीआय, एक्सिस आणि आयसीआयसीआय बँकेच्या निवडक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 4,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. त्यामुळे फोनची प्रभावी किंमत 92,990 रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. कंपनीकडून ईएमआयची सुविधाही उपलब्ध असून दरमहा 3,410 रुपयांपासून हप्ता सुरू होतो. जुना स्मार्टफोन एक्स्चेंज केल्यास 39 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस मिळण्याची संधीही आहे. त्यामुळे प्रीमियम स्मार्टफोन खरेदीसाठी ही आकर्षक ऑफर मानली जात आहे.
९) ‘देऊळ बंद 2’ची बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई; ‘राजा शिवाजी’ला टाकलं मागे
प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. अवघ्या 9 ते 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 600 टक्क्यांहून अधिक नफा कमावला आहे. ‘सॅकनिल्क’च्या माहितीनुसार, प्रदर्शनाच्या 31 व्या दिवशी चित्रपटाने 1.10 कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन केले. आतापर्यंत चित्रपटाने 83.58 कोटी रुपयांची कमाई करत रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ‘राजा शिवाजी’ने 70.98 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता, तर ‘देऊळ बंद 2’ने 71.18 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. आता या चित्रपटाची नजर ‘बाईपण भारी देवा’च्या विक्रमावर असून, मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
१०) इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; जसप्रीत बुमराहचे ३ वर्षानंतर कमबॅक
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघात अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन झाले असून, बुमराह तब्बल तीन वर्षांनंतर वन-डे संघात परतला आहे. मात्र, अफगाणिस्तान मालिकेत खेळलेले यशस्वी जयस्वाल, हर्ष दुबे, प्रिन्स यादव यांच्यासह मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्या यांना संघातून वगळण्यात आले आहे. आगामी मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघात मोठे बदल करण्यात आल्याने क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या मालिकेकडे लागले आहे.





