Hasan Ali Injury : मैदानावर मोठा अपघात! कॅच पकडताना गोलंदाज डोक्यावर पडला; स्ट्रेचरवरून न्यावे लागले बाहेर; पाहा थरारक VIDEO
Hasan Ali Injury : हसन अलीला तीव्र चक्कर येत असल्याने वैद्यकीय पथकाने त्याला अत्यंत काळजीपूर्वक स्ट्रेचरवर झोपवले आणि तपासणीसाठी मैदानाबाहेर नेले.

Hasan Ali suffered a scary head injury video viral : बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानावर एक थरारक आणि भीतीदायक घटना घडली. पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अलीचा भीषण अपघात झाला. सामन्यादरम्यान स्वतःच्याच चेंडूवर झेल (कॅच) घेण्याच्या प्रयत्नात हसन अली जमिनीवर कोसळल्यानंतर डोक्याला जोरदार दुखापत झाली. परिस्थिती इतकी गंभीर होती की त्याला थेट स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
नेमका कसा झाला अपघात?
सिलहट येथे खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आठव्या षटकात ही घटना घडली. हसन अली षटकातील पाचवा चेंडू टाकत होता. फलंदाज तंझीद हसन तमीमच्या बॅटची बाहेरील कडा घेऊन चेंडू हवेत उडाला. हसन अलीने आपल्या फॉलो-थ्रूमध्ये धावत जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्याचा समतोल बिघडला आणि तो थेट पिचवर कोसळला. पडताना त्याचे डोके खेळपट्टीवर अत्यंत जोराने आदळले. काही सेकंद तो मैदानावर पूर्णपणे निपचित पडून होता, ज्यामुळे मैदानावर शांतता पसरली. त्यानंतर त्याने डोके पकडले आणि तातडीने वैद्यकीय पथकाने मैदानात धाव घेतली.
— Talha Nawaz (@TalhaDigital007) May 16, 2026
स्ट्रेचरवरून नेले बाहेर, पण नंतर…
🚨WILL PAKISTAN BE ALLOWED TO MAKE A CONCUSSION SUBSTITUTE??
– Hassan Ali Absence Can Really Harm Us pic.twitter.com/BYcsg053hd
— Talha Nawaz (@TalhaDigital007) May 16, 2026
हसन अलीला तीव्र चक्कर येत असल्याने वैद्यकीय पथकाने त्याला अत्यंत काळजीपूर्वक स्ट्रेचरवर झोपवले आणि तपासणीसाठी मैदानाबाहेर नेले. यावेळी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक सर्फराझ अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. हसन अलीच्या षटकातील उरलेला चेंडू सलमान अली आगाने पूर्ण केला. सुदैवाने, ही दुखापत फारशी गंभीर नव्हती. योग्य उपचारांनंतर १९ व्या षटकात हसन अली पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला, ज्यामुळे चाहत्यांनी आणि संघाने सुटकेचा श्वास सोडला.
कसोटी सामन्याची सद्यस्थिती –
सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद अब्बासने सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर महमूदुल हसन जॉयला बाद करून पाकिस्तानला शानदार सुरुवात करून दिली. त्यानंतर तंझीद हसन तमीम आणि मोमिनुल हक यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अब्बासने तंझीदला २६ धावांवर बाद करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला.





