Disha Parivar Charitable Trust: यशाची शिखरे गाठून सर्वांचा विश्वास सार्थ ठरवा – राजीव खांडेकर
Disha Parivar Charitable Trust:

सामाजिक उत्तरदायित्वाचे भान जपणे ही काळाची गरज!
दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिष्यवृत्ती धनादेश वितरण
Disha Parivar Charitable Trust: शिक्षणाच्या बळावर प्रगती करताना आपल्याला इथंपर्यंत आणणाऱ्या प्रत्येकाच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही, याची काळजी घेणे ही आपली खरी जबाबदारी आहे. दिशासारख्या संस्थांच्या साथीने अडचणींवर मात करून यशाची शिखरे गाठताना समाज आणि देशाप्रति असलेली कर्तव्ये पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांच्या पाठिंब्यामुळे आणि कष्टांमुळे आपण घडलो, त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत एक संवेदनशील माणूस म्हणून समाजाचे देणे फेडणे, हाच खऱ्या अर्थाने यशाचा आणि प्रगतीचा मार्ग आहे, असा कानमंत्र ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित शिष्यवृत्ती धनादेश वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात रविवारी हा हृद सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या वेळी दैनिक प्रभातच्या वतीने ४० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. याप्रसंगी मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त दत्तात्रय वारे गुरुजी, उद्योजक गणेश जाधव, ‘दैनिक प्रभात’चे सरव्यवस्थापक रविकुमार इंडी, माजी सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, ट्रस्टचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी, कार्याध्यक्ष अरुण कुलकर्णी, विश्वस्त विवेक अगरवाल, सचिव निखिल पडवळ आणि सुजित शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी राजीव खांडेकर यांनी आजच्या जेन झी अर्थात नव्या पिढीच्या विचारसरणीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, आजूबाजूला नकारात्मकतेचे सावट असतानाही दिशासारख्या संस्था समाजात आशेचे किरण पेरण्याचे मोलाचे काम करत आहेत. आजच्या नव्या पिढीची विचार करण्याची आणि व्यक्त होण्याची शैली पूर्णपणे वेगळी आहे. जुनाट विचारांना थेट विरोध दर्शवत, कोणत्याही समस्येला स्वतःच्या अनोख्या पद्धतीने उत्तर देण्याची त्यांची ही शैली अनेकांना चक्रावून टाकते. अशा स्थितीत दोन पिढ्यांमधील ही दरी दूर फेकून, या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण एक जबाबदार घटक म्हणून आपली भूमिका कशी पार पाडू शकतो, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
दरम्यान अनिरुद्ध करंदीकर यांनी विद्यार्थ्यांना एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) व तंत्रज्ञानाच्या युगात मोफत मार्गदर्शनाची तयारी दर्शवली. आरती भोसले यांनी दिशा केवळ आर्थिक मदत न देता देणगीदार आणि विद्यार्थी यांच्यात आपुलकीचे नाते निर्माण करते, असे सांगत कौतुक केले. संस्थेची पायाभरणी २० वर्षांपूर्वी झाली असून, आज माजी विद्यार्थीच पदाधिकारी बनून ही जबाबदारी सांभाळत आहेत, याचा विशेष आनंद राजाभाऊ चव्हाण यांनी व्यक्त केला.
उद्योजक गणेश जाधव यांनी २० वर्षे सातत्याने उपक्रम चालवणाऱ्या दात्यांच्या योगदानाची प्रशंसा केली. अध्यक्षीय भाषणात भाऊसाहेब जाधव म्हणाले, दिशा परिवारात देणगीदार व मदत घेणारे गरजू विद्यार्थी हे सर्व जाती-धर्माचे आहेत. त्यामुळे इथे केवळ शिष्यवृत्तीच दिली जात नाही, तर समाजाला एकसंध ठेवण्याची भावना रुजवली जाते. सुजित शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन चिन्मय कुलकर्णी यांनी, तर शाम क्षीरसागर यांनी आभार मानले.
सरकारी शाळांना जागतिक दर्जा…
या वेळी बोलताना दत्तात्रय वारे गुरुजी यांनी शिक्षणाच्या व्यापारीकरणावर परखड भाष्य मांडले. ते म्हणाले, की प्रत्येक गावात सरकारी शाळा आदर्श शाळा कशा होतील, त्यासाठी कोणती पावले उचलायला हवीत, याचे आम्ही डाॅक्युमेंटेशन केले असून, ते आम्ही एनसीआरटीकडे सादर केले आहे. जर सगळे मनासारखे झाले, तर येत्या तीन वर्षांत शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्यांचा बाजार नाही उठवला, तर नाव बदलून ठेवेन, फक्त आपल्या सोबतीची गरज आहे. मुले अप्रगत राहिल्यास त्याची १०० टक्के जबाबदारी शिक्षकांनीच घेतली पाहिजे. अवघ्या ३ विद्यार्थ्यांवरून सुरू झालेल्या जालिंदरनगर शाळेत आज ७०० हून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. समर्पित शिक्षक आणि लोकसहभागाच्या जोरावर महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी शाळेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
तुमचे शिक्षण थांबणार नाही
दैनिक प्रभाततर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. प्रभात आणि आणि दिशा परिवार गेल्या १५ वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. या माध्यमातून प्रभातकडून आतापर्यंत ५५० ते ६०० गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला आहे. याचे सर्व श्रेय प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांना जाते. या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासासाठी मार्गदर्शन केले जाते. आर्थिक अडचणींमुळे तुमचे शिक्षण कधीही थांबणार नाही, ती संपूर्ण जबाबदारी आमची आहे. मात्र त्यासाठी कष्ट करण्याची तयारी हवी. कष्टाला पर्याय नाही. अभ्यासासोबत काही अडचण असल्यास, त्यांना मदतीसाठी दै. प्रभात सदैव पाठीशी राहील, अशी ग्वाही प्रभातचे सरव्यवस्थापक रविकुमार इंडी यांनी या वेळी दिले. विद्यार्थ्यांनी मोबाइलचा अवाजवी वापर टाळून नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. माजी सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी यांनी संस्थेचे संस्थापक राजाभाऊ चव्हाण यांना पुन्हा विश्वस्त म्हणून सामावून घेण्याची इच्छा व्यक्त करत, मदत मिळालेले विद्यार्थी पुन्हा समाजाला मदत करण्यासाठी पुढे येत आहेत, हेच या उपक्रमाचे खरे यश आहे, असे नमूद केले.
मी साताऱ्याची असून, सध्या बीएएमएसच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. सुरुवातीला आळंदीवरून पुण्याला रोज ये- जा करावी लागे. वसतिगृहाची अत्यंत गरज असताना मला दिशा परिवाराबद्दल माहिती मिळाली. तेथे प्रवेश मिळाला. यामुळे माझा रोजचा प्रवासाचा वेळ तर वाचलाच; शिवाय दिशा परिवारकडून मला पुढील तीन वर्षांसाठी शिष्यवृत्तीही मिळाली. येथे केवळ निवासाचीच सोय नव्हे, तर शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकासाचे उत्तम धडे मिळाले. आज मी जो काही प्रवास करू शकले आहे, त्याचे सर्व श्रेय दिशा परिवारलाच जाते.
– पूजा बोरकर, विद्यार्थिनी





