Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना न्यायालयाचा दणका! 2016 मध्ये नेमकं काय घडलं होतं?
Ritu Tawde : २०१६ मधील शिक्षक मारहाण प्रकरणाच्या सुनावणीसाठी रितू तावडे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

Court deals a blow to Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना २०१६ मधील एका शिक्षक मारहाण प्रकरणात न्यायालयाने दंड ठोठावला आहे. सुनावणीदरम्यान वारंवार न्यायालयात प्रत्यक्ष हजर न राहिल्याने मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना ३०० रुपयांचा आर्थिक दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.
२०१६ मधील शिक्षक मारहाण प्रकरणाच्या सुनावणीसाठी रितू तावडे यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्या सुनावणीला गैरहजर राहिल्या. यापूर्वीच्या सुनावणीवेळीही त्या न्यायालयात उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यावेळी न्यायालयाने त्यांना शेवटची संधी देत वैयक्तिक उपस्थितीतून सूट दिली होती.
मात्र, त्यानंतरच्या सुनावणीतही रितू तावडे यांच्यासह काही आरोपी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यांच्या वकिलामार्फत पुन्हा वैयक्तिक उपस्थितीतून सूट मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. यानंतर न्यायालयाने उपस्थितीतून सूट देण्याचा अर्ज मंजूर केला. मात्र, रितू तावडे आणि संबंधित आरोपींना प्रत्येकी ३०० रुपये दंड भरण्याचे आदेश दिले.
नेमकं प्रकरण काय?
२९ जुलै २०१६ रोजी मुंबईतील वाकोला परिसरातील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत एका शिक्षकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात रितू तावडे यांच्यासह अन्य सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सध्या आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्यक्ष साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्याची कार्यवाही सुरू आहे.
‘हंडा मोर्चा’मुळे चर्चेत
रितू तावडे यांनी घाटकोपर परिसरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर काढलेला ‘हंडा मोर्चा’ही चर्चेत आला होता. या आंदोलनानंतर प्रशासनाने पाणीचोरीविरोधात कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
तसेच त्या ‘मराठा प्रतिष्ठा’ संस्थेच्या अध्यक्षा असून, ‘महिला आर्थिक विकास महामंडळा’च्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी काम केल्याचे सांगितले जाते.
रितू तावडे सध्या मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या हातातील महागड्या घड्याळाच्या किमतीवरूनही त्यांच्यावर टीका झाली होती. या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले होते. आता २०१६ मधील शिक्षक मारहाण प्रकरणात न्यायालयाने ठोठावलेल्या दंडामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.





