Vidyananda Bapat : 48 तासांच्या आत माफी मागा! पुण्याच्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस, नेमकं प्रकरण काय?
Vidyananda Bapat : नोटीसमध्ये नमूद केलेल्या मुदतीत समाधानकारक खुलासा न केल्यास फौजदारीसह अन्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Vidyananda Bapat : डीजे आणि हिंदू सणांबाबत भूमिका मांडणारे पुण्यातील विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी ही नोटीस पाठवली असून, त्यामध्ये ४८ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण देऊन हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. नोटीसमध्ये नमूद केलेल्या मुदतीत समाधानकारक खुलासा न केल्यास फौजदारीसह अन्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
नोटीसमध्ये काय म्हटले आहे?
गणेशोत्सव, हिंदू धार्मिक परंपरा आणि भगवान श्री गणेश यांच्याविषयी विद्यानंद बापट यांनी केलेली वक्तव्ये अवमानकारक आणि आक्षेपार्ह असल्याचा दावा नोटीसमधून करण्यात आला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक श्रद्धा आणि आराध्य दैवतांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भूमिका ॲड. प्रदीप नाईक यांनी घेतली आहे.
मात्र, ध्वनीप्रदूषण, लाऊडस्पीकर, मिरवणुका अथवा सार्वजनिक उत्सवांबाबत कायदेशीर आणि सभ्य पद्धतीने मत मांडण्याच्या अधिकाराला विरोध नसल्याचेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील सभेनंतर चर्चेत विद्यानंद बापट हे पुण्यातील नारायण पेठ येथे वास्तव्यास असून, बीपीओ क्षेत्रात नोकरी करतात. मुंबई विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जाते.
पुणे महापालिकेतील सभेत डीजेच्या मुद्द्यावर त्यांनी आपली भूमिका मांडत विरोध दर्शवला होता. त्यानंतर ते चर्चेत आले. त्यांच्या भूमिकेला काहींनी समर्थन दिले, तर काहींनी विरोधही केला. सोशल मीडियावरही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
डीजेसह ढोल आणि हिंदू सणांबाबतच्या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर टीकाही झाली. काही दिवसांपूर्वी त्यांना मारहाण झाल्याची घटनाही घडली होती. मात्र, तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.






