Baramati News : आईसोबत भांडण अन् घरातून बाहेर पडताच… आमदाराच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू
Baramati News : हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्टता नाही

Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (PA) अजित दशावतारे यांच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीतील रुई परिसरातील साईनगर भागात 12वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. थोड्याच वेळात आमदार रोहित पवार याठिकाणी येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अवनी अजित दशावतारे असे मृत मुलीचे नाव असून ती इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. शनिवारी रात्री तिचे आईसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर ती घरातून बाहेर पडली. बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. याबाबत पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, रविवारी सकाळी साईनगर परिसरात अवनीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.
हा प्रकार हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत.
शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली.
अल्पवयीन मुलीच्या अशा दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाच्या सर्व बाजूंनी कसून तपास करण्यात येत असून, शवविच्छेदन अहवालानंतर पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.






