Amravati Hospital Fire : व्हेंटिलेटरचा स्फोट अन् नवजात बाळांच्या कक्षात धुराचे लोट; तीन बालकांचा दुर्दैवी शेवट, तर…
Amravati Hospital Fire : स्त्री जिल्हा रुग्णालयाची ही नवीन इमारत बांधून अवघ्या वर्षभरापूर्वी हे रुग्णालय सुरु झाले होते.

Amravati Hospital Fire : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात सोमवारी पहाटे व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. यात तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा बालकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी चार बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर दोन परिचारिकांच्या प्रसंगावधानामुळे या कक्षात असलेल्या सहा बाळांचा जीव वाचल्याची माहिती आता समोर येत आहे. या परिचारिकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता बाळांना वाचवले. बाळांना वाचवताना आगीमुळे आमचे हातही भाजले. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नवीन इमारत बांधून वर्षभरापूर्वी रुग्णालय सुरु
ही आग इतकी भीषण होती की, नवजात बालकांच्या कक्षात असलेले एसी आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या आहेत. दुर्दैवाने तीन बालकांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला. स्त्री जिल्हा रुग्णालयाची ही नवीन इमारत बांधून अवघ्या वर्षभरापूर्वी हे रुग्णालय सुरु झाले होते. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एकूण तीन नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत.
कक्षात एकूण 12 बालके
या तीन कक्षांमध्ये प्रत्येकी 13 अशी मिळून 39 नवजात बालकांवर उपचार घेण्याची क्षमता आहे. यापैकी एका कक्षात आग लागली. आग लागली तेव्हा या कक्षात एकूण 12 बालके होती. मात्र आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित का झाली नाही? असा सवाल करत रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
हेही वाचा:
Pimpri-Chinchwad : प्रत्येक विभागातील आदेश, परिपत्रकांची होणार नोंद






