Top 10 News: नरहरी झिरवळांचं मंत्रिपद जाणार?, “गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरु देणार नाही” आणि पंतप्रधानांची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, वाचा अशा टॉप १० बातम्या
Top 10 News: मंत्रालयात लाचखोरीच्या प्रकरणामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या मंत्री नरहरी झिरवळांचा पाय आणखी खोलात गेलाय.

नरहरी झिरवळांचं मंत्रिपद जाणार?
Top 10 News: मंत्रालयात लाचखोरीच्या प्रकरणामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या मंत्री नरहरी झिरवळांचा पाय आणखी खोलात गेलाय. मंत्रालयात झिरवळांच्या खात्यातील क्लर्कला 35 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली होती.. त्यानंतर झिरवळांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता.आता पुन्हा एकदा झिरवळांचे कथित व्हिडीओ समोर आल्यानं झिरवळ अडचणीत आलेत. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अवघ्या 4 महिन्यातच सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं. पुढे बोगस कागदपत्राचा वापर करत घरं लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंचंही मंत्रिपद गेलं. आता झिरवळांचे कथित व्हिडीओ समोर आल्यानं त्यांच्याही मंत्रिपदावर टांगती तलवार आहे. त्यामुळे झिरवळांचा व्हिडीओ खरा आहे का? झिरवळांना अडकवण्यासाठी कुणी हनी ट्रॅपचा कट रचलाय का? आणि हा व्हिडीओ जर खरा असेल तर सरकारी निवासस्थानात राज्याच्या अब्रूचे धिंडवडे काढल्यानं झिरवळांचा राजीनामा घेतला जाणार का? आणि झिरवळांचं मंत्रिपद गेल्यास मुंडे पुन्हा इन होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
भोंदूबाबा अशोक खरातची केली HIV टेस्ट
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान , महिलांवर अत्याचार करणाऱ्या खरातची एसआयटीकडून चौकशी करण्यात येत असून त्याची HIV टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं सांगण्यात येतंय. भविष्य सांगण्याचा बहाण्याने अशोक खरात याने 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं. अशोक खरातनं अनेक महिलांचं शोषण केल्यानं पिढीत महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आलीय. तर दुसरीकडे खरातने महिलांवरील अत्याचारात जबाब देताना हे सर्व विधी लिखित असल्याचा अजब दावा केला करत स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जातंय.
गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरु देणार नाही
गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरु देणार नाही, मी ही शपथ चितेवर खाल्ली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि तुमच्या पायात घातले तरी ही फेड होणार नाही, असं भावनिक भाषण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडच्या भायाळा गावात आयोजित नारळी सप्ताहात केलं. तसेच लोकसभा पराभव झाल्यानंतर माझ्या भावांनी आत्महत्या केल्या. इतकं प्रेम तुम्ही मला दिलं. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली. राजकारण संपल्यानंतर मी सुद्धा हरिभक्त पारायणाकडे जाणार असल्याचं मुंडे यांनी यावेळी जाहीर केलं. तर सगळे प्रेमाने राहा एकजुटीने राहा एकमेकांचा हात धरून रहा, असे आवाहन उपस्थित भाविकांना पंकजा मुंडेंनी केलं.
तरुणांना परदेशी विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
भारतीय नागरिकांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून त्यांची मानवी तस्करी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सीबीआयने (CBI) छडा लावला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुनील नेल्लाथू रामकृष्णन उर्फ ‘कृष’ याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. सुनील हा म्यानमारमधील कुख्यात सायबर फसवणूक केंद्रांमध्ये भारतीयांना गुलाम म्हणून विकण्याचे काम करत असल्याचा खळबळजनक आरोप त्याच्यावर आहे. तिथे त्यांना जबरदस्तीने “डिजिटल अरेस्ट”, रोमांस फ्रॉड आणि क्रिप्टो फसवणूक करण्यात लावले जात होते. पीडितांना कैदेत ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट भारतातील सुशिक्षित तरुणांना थायलंडमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवायचे. पीडितांना आधी दिल्ली आणि तिथून बँकॉकमार्गे विमानाने नेले जायचे. मात्र, थायलंडला पोहोचल्यानंतर त्यांना रस्तेमार्गे गुपचूप म्यानमारमधील ‘म्यावाडी’ विशेषतः KK पार्कपरिसरातील सायबर गुन्हेगारी केंद्रांमध्ये नेले जात होते.
एकवीरा देवी गडावर राडा
एकवीरा देवी गडावर चैत्र पौर्णिमेनंतर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. एकवीरा देवी गडावर दर्शनासाठी आलेल्या भक्तांचे दोन गट आमनेसामने आले. लाथाबुक्क्या आणि दगडाने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या मुळे गडावर तणावाचे वातावरण होते. या हाणामारीमध्ये १५ जण जखमी झाले आहेत. चैत्र पौर्णिमेनिमित्त लोणावळ्यातल्या कार्ला याठिकाणी आई एकवीरा देवी गडावर मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. या यात्रेसाठी राज्यभरातून तसेच मुंबई रत्नागिरी, पनवेल, भिवंडी आणि ठाणे येथून असंख्य पालख्या गडावर दाखल झाल्या होत्या. त्यातच पालखी पुढे नेण्याच्या कारणावरून रात्री उशिरा पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाडात दोन गटांमध्ये वाद झाला. या वादानंतर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
राज्यातील ६ जिल्ह्याना यलो अलर्ट जारी Top 10 News:
राज्यात काही भागात पुढील काही दिवस अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे. विदर्भ, मराठवाड्यानंतर काल अवकाळी पावसाने कोकणाला झोडपून काढलं. कोकणात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अचानक पडलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाली. आज पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित ठिकाणी उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. आज विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्यानं सतर्कतेचा इशारा देत येलो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज भारतात महत्त्वाची बैठक होणार आहे. आज नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅससंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. आज सायंकाळी 6.30 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. प्रत्येक राज्यातील सध्याचा इंधन पुरवठा यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. भविष्यातील उपाययोजनांसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान ,इराण आणि अमेरिका, इस्त्रायलच्या युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची केवळ अफवा आहे. राज्यात अनेक शहरांमध्ये इंधन टंचाईच्या अफवा पसरवण्यात येत आहे.त्यावर सरकारकडून अशा अफवांपासून दूर राहावे आणि केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असं मंत्रालयाने म्हटलंय. पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा LPG ची कमतरता नाही.
देशात 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू
देशात 1 एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. केंद्र सरकारकडून लागू करण्यात येणारा हा नवीन आयकर नियम जवळपास 60 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या जुन्या कायद्याची जागा घेणार आहे. सरकारच्या मते, हा केवळ करप्रणालीतील बदल नसून संपूर्ण कायदा अधिक डिजिटल, पारदर्शक आणि सुलभ करण्याचा प्रयत्न आहे. सामान्य करदात्यांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे टॅक्स स्लॅब किंवा दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र रिपोर्टिंग, फाइलिंग आणि डिस्क्लोजरच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.नवीन नियमांनुसार, वेतनभोगी कर्मचाऱ्यांसाठी मील बेनिफिट्समध्ये मोठी वाढ करण्यात आलीय. त्यासोबत Form 16, पॅनकार्ड आणि एचआरएमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणारेत.
होर्मुझचे नेतृत्व करणारे इराणचे नौदल कमांडर ठार
इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात इराणचे नौदल कमांडर अलीरेझा तांगसिरी यांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात इस्रायल आणि अमेरिकेने आतापर्यंत इराणच्या अनेक प्रमुख लष्करी कमांडरांना लक्ष्य केले आहे. आता होर्मुझ नाकेबंदीचे नेतृत्व करणाऱ्या अलीरेझा तंगसिरी यांना ठार केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद ठेवण्याची जबाबदारी अलीरेझा तांगसिरी यांच्यावर होती. दरम्यान इस्रायलनं त्यांच्या मृत्यूचा दावा केला असला तरी इराणने अद्याप या घटनेची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. याबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. दरम्यान बंदर अब्बासमधील या हल्ल्यामुळे या प्रदेशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
खरात प्रकरणी ममता कुलकर्णीचा महिलांवर संशय Top 10 News:
अशोक खरात प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री आणि साध्वी ममता कुलकर्णी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. अशोक खरात प्रकरणात पीडित ठरलेल्या महिलांवरच ममता कुलकर्णी यांनी सवाल उपस्थित केलाय. अशोक खरातच्या प्रकरणावर बोलताना ममता कुलकर्णी म्हणाल्या की, “जेव्हा या महिला अशोक खरातकडे गेल्या, तेव्हा त्यांची बुद्धी कुठे गेली होती? या सर्व महिला इतक्या मूर्ख होत्या का? की अशोक खरात त्यांना स्पर्श करत असताना नक्की काय घडतंय, हे त्यांच्या लक्षातंच आलं नाही? जर एखाद्यानं त्यांना आपल्या बेडरूममध्ये बोलावलं, तर त्या तिथे सरळ चालत जातील का? यात दोष त्यांचाही आहे…”आजकाल, प्रत्येकजण धर्माच्या नावाखाली लोकांची लूट करत आहे. या तथाकथित धार्मिक गुरूंच्या भरवशावर राहणे थांबवा आणि तुमची भक्ती थेट ईश्वरावरच केंद्रित करा…”असा सल्लादेखील तिने दिलाय.


