कोल्हापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेनेने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर सई खराडे यांनी आपले पती व कोल्हापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अजित खराडे, सुपुत्र शिवतेज खराडे यांच्यासह एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्याचवेळी कोल्हापूरचे माजी महापौर तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत अडगुळे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. शिंदे यांनी सई खराडे, अजित खराडे, शिवतेज खराडे आणि इंद्रजीत अडगुळे यांचे पक्षात स्वागत करताना त्यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हा पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सई खराडे या कोल्हापूर महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर होत्या, तर अजित खराडे हे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रभावी नेते मानले जातात. त्यांच्या पक्षांतरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा मनुष्यबळाचा फटका बसला असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूरच्या राजकारणात निर्माण झालेल्या या खळबळीमुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.